सूर्यनमस्कार स्पर्धेला दीड हजार स्पर्धकांचा प्रतिसाद
शिवछत्रपती ट्रस्ट व जिजाऊ प्रतिष्ठान महाराष्ट्र हॅप्पी लाईफ फाउंडेशन यांच्या योगा उपक्रमाची यशस्विता
शिवछत्रपती ट्रस्ट, जिजाऊ प्रतिष्ठान महाराष्ट्र, हॅप्पी लाईफ फाउंडेशन सातारा आणि अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने कला वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या सूर्यनमस्कार स्पर्धेला सातारा शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सातारा : शिवछत्रपती ट्रस्ट, जिजाऊ प्रतिष्ठान महाराष्ट्र, हॅप्पी लाईफ फाउंडेशन सातारा आणि अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने कला वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या सूर्यनमस्कार स्पर्धेला सातारा शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेसाठी वेगवेगळ्या वयोगटातील सुमारे दीड हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेच्या नेटक्या आणि आखीव संयोजनामुळे ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली.
शिवछत्रपती ट्रस्ट व जिजाऊ प्रतिष्ठान यांचे उपक्रम नेहमीच लोक सहभागातील आणि वैशिष्ट्यपूर्ण असतात याचा प्रत्यय पुन्हा एकदा शनिवारी आला. कला वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये या सूर्यनमस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धा यशस्वी होण्यामागे या स्पर्धेचे नेटके नियोजन आकर्षक बक्षिसे हे स्पर्धचे वैशिष्टय ठरले. योग प्रसारासाठी कार्यरत असणाऱ्या हॅपी लाईफ फाउंडेशन व अखिल भारतीय योगशिक्षक महासंघाचे शिक्षक प्रल्हाद पार्टे, अनुराधा इंगळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेचे उद्घाटन मासचे अध्यक्ष व उद्योजक राजेंद्र मोहिते यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपच्या गटनेत्या व जिजाऊ प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सिद्धी पवार, माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र चव्हाण, शिवछत्रपती ट्रस्टचे अध्यक्ष रवी पवार, माजी नगरसेवक किशोर पंडित, भाजप सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, माजी नगरसेविका आशा पंडित यावेळी उपस्थित होत्या.
निरामय मन आणि निरामय योग यामुळे सात्विक विचारांची निर्मिती होते. मनुष्याने आपल्या आयुष्यामध्ये शरीर आणि मन संतुलित ठेवण्यासाठी सूर्यनमस्कार करणे आवश्यक आहे. योगामुळे ताण-तणाव दूर होण्यास मदत होते. संतुलित योग हे सुखी आयुष्याचे लक्षण आहे. त्यामुळे योगाचा सराव हा नियमित व्हायला हवा, असे असे प्रतिपादन माजी अध्यक्ष राजेंद्र मोहिते यांनी केले.
सूर्यनमस्कार स्पर्धा आयोजित करण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे गेल्या दोन वर्षापासून करोनाच्या त्रासामुळे आणि व्याधींमुळे तंदुरुस्त शरीर ही संकल्पनाच थोडीशी मागे पडली आहे सातारकरांना योगाची सवय लागावी आणि या माध्यमातून संतुलित शरीर कसे राखावे याची ओळख व्हावी याकरिता या उपक्रमाची आखणी केल्याचे प्रतिपादन सिद्धी पवार यांनी केले.
रवींद्र पवार यांनी प्रास्ताविकामध्ये विविध उपक्रमांच्या कार्याचा आढावा घेतला आणि सूर्यनमस्कार स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
ही स्पर्धा वय वर्ष सहा ते आठ, आठ ते दहा, 16 ते 25 व खुला गट अशा चार गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती. भारतीय योग शिक्षक महासंघाच्या वतीने या योगासन स्पर्धेचे अचूक परीक्षण करण्यात आले. सातारकरांनी विशेषतः विद्यार्थी वर्गातून या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सूर्यनमस्कार स्पर्धेच्या माध्यमातून एक वेगळा प्रकार सुरू होत असून निरामय मन राखण्यासाठी सूर्यनमस्कार शास्त्रीय पद्धतीने कसा करावा, याचा चांगलाच सराव झाल्याचे मत सहभागी विद्यार्थ्यांनी यावेळी नोंदविले.


