maharashtra

वकिलांच्या कार्यालयाला वाणिज्य कर लावू नये

एडवोकेट सचिन तिरोडकर यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

शाहूनगर शाहूपुरी व शहराच्या हद्दवाढीतील नवीन भागात असणाऱ्या वकिलांच्या कार्यालयांना वाणिज्य कर लावू नये, अशी मागणी शाहूनगर येथील एडवोकेट सचिन तिरोडकर यांनी केली आहे. यासंदर्भात शुक्रवारी त्यांनी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

सातारा : शाहूनगर शाहूपुरी व शहराच्या हद्दवाढीतील नवीन भागात असणाऱ्या वकिलांच्या कार्यालयांना वाणिज्य कर लावू नये, अशी मागणी शाहूनगर येथील एडवोकेट सचिन तिरोडकर यांनी केली आहे. यासंदर्भात शुक्रवारी त्यांनी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद आहे की, शाहूनगर विलासपुर, दरे खुर्द, शाहूपुरी हे भाग नव्याने शहराच्या हद्दीत समाविष्ट झाले आहेत. येथील मिळकतींचा सर्वे आणि मिळकतींची मोजमापे करण्याचे काम नुकतेच नगरपालिकेने पूर्ण केले. सदर भागांमध्ये वकील वर्ग मोठ्या प्रमाणावर राहत असून वकील वर्गाची ऑफिस सुद्धा घराच्या जवळ आहेत. सदर मिळकतींच्या नोंदीची प्रक्रिया झाली असून त्यामध्ये वकिलांच्या ऑफिसची मोजमापे घेतली गेली आहेत. त्यांची वाणिज्य अशी वर्गवारी करण्यात आली आहे.
भविष्यात सदर ऑफिसेस वाणिज्य वर्गाप्रमाणे जाणार आहेत. त्यामुळे वकिलांना ज्यादा आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे. वकील समाजातील महत्त्वाचा घटक असून तो लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम करतो. इतर व्यवसायाप्रमाणे नफा मिळवणे हा वकिली व्यवसायाचा उद्देश नाही. वकिलांचे कार्यालय हे वाणिज्य वर्गामध्ये मोडत नाही. त्यांना वाणिज्य वर्गाच्या मिळकतीप्रमाणे जादा दराने कर आकारणी करण्यात येऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाने अनेक न्यायनिवाडे असताना स्पष्ट केले आहेत. हद्दवाढीच्या माध्यमातून सातारा नगर परिषदेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या वकिलांच्या ऑफिसेस व शहरातील इतर भागातील वकिलांच्या ऑफिसेस यांना वाणिज्य कर दराप्रमाणे कर आकारणी होऊ नये, अशी मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.