धमक असेल तर रामराजेंनी एमआयडीसी कोरेगावात नेऊन दाखवावी
आ. जयकुमार गोरे : राष्ट्रवादीने कायम सत्तेच्या सिंहासनावर बसवूनही त्यांची एहसान फरामोशी
रामराजेंच्यात धमक आणि राजाचे रक्त असेल तर त्यांनी एमआयडीसी कोरेगाव तालुक्यात नेऊन दाखवावी, असे प्रतिआव्हान भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी दिले.
पुसेगाव : मी क्रियाशील आणि कर्तुत्ववान आहे म्हणूनच म्हसवडची एमआयडीसी मंजूर झाली. हा प्रकल्प माझ्याच माणमध्ये होणार आहे. रामराजेंच्यात धमक आणि राजाचे रक्त असेल तर त्यांनी एमआयडीसी कोरेगाव तालुक्यात नेऊन दाखवावी, असे प्रतिआव्हान भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी दिले. ज्या राष्ट्रवादीने रामराजेंना कायम सत्तेच्या सिंहासनावर बसविले त्या राष्ट्रवादीशी एहसान फरामोशी करुन त्यांनी सत्ता गेली की दोन वेळा भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न केला. मात्र अशी प्रवृत्ती भाजपमध्ये नको म्हणून मी आणि खा. रणजितसिंह निंबाळकरांनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आ. गोरेंच्या निष्क्रियपणामुळे म्हसवड एमआयडीसी कोरेगावला गेली, धमक असेल तर त्यांनी ती परत आणावी, असे आव्हान दिले होते. त्याबद्दल बोलताना आ. जयकुमार गोरे म्हणाले, रामराजेंचे वय झाले आहे. साठी बुध्दी नाठीच्या पलीकडे ते गेले आहेत. त्यांच्या मेंदूचे संतुलन बिघडले आहे. अनेक वर्षे सत्तेत राहून त्यांनी मंत्रीपदे भोगली आहेत. ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. पवार साहेबांनी त्यांना कायम सत्तेच्या सिंहासनावर ठेवले. मात्र हे महाभाग सत्ता गेली कि बाहेर तोंड काढतात. मागच्या लोकसभा निवडणूकीवेळी त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला होता. आताही विधानपरिषदेवर निवड झाल्यावर सत्ता गेली कि लगेच त्यांनी भाजप किंवा शिंदे गटात जाण्याचे प्रयत्न केले होते. आपण सत्तेशिवाय रहायचे का ? आपल्यावर केसेस होतील, आपल्याला तुरुंगात टाकतील, आपल्यावर ईडीची कारवाई होईल, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा उद्योग केला होता. अशा एहसान फरामोश माणसाने एमआयडीसीबाबत माझ्यावर बोलणे हास्यास्पद आहे.
रामराजेंनी आत्तापर्यंत एमआयडीसी असेल तिथे जमिनी खरेदी करुन कोट्यवधींची माया जमविली आहे. कोरेगाव तालुक्यातही त्यांनी जमिनी खरेदी करुन ठेवल्या आहेत. एमआयडीसी तिकडे झाली तर ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा शेकडो कोटी मिळविण्याचा डाव होता. अजित दादांसोबतच्या बैठकीत त्यांनी म्हसवडबाबत खोटी प्रतिकूल माहिती देवून एमआयडीसी पळविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी दिल्लीपर्यंत प्रयत्न केले. कोरेगाव भागातील लोकांनी आम्हाला भूमिहीन व्हायचे नाही, एमआयडिसी आमच्याकडे नको असे सांगून रामराजेंना अक्षरशः शिव्या दिल्या. लोक त्यांच्या अंगावर गेले. ज्या आयएएस अधिकाऱ्याने एमआयडीसीसाठी प्रयत्न केले असे रामराजे खोटे सांगतात तो अधिकारी आयुक्त असताना माणमध्ये दोन गुंठ्याचा पकल्प मार्गी लागू शकला नाही. ऐऱ्या-गैऱ्यांची नावे घेऊन ते काहींची लाल करायचा प्रयत्न करत आहेत, असा टोलाही आ. गोरेंनी लगावला.
भाजपमध्ये जाताना माझ्या तीन मागण्या होत्या...
भाजपमध्ये जाताना मायणी, कुकुडवाडसह ३२ गावे तसेच जिहे-कठापूर वाढीव योजेनेला सुप्रमा देवून उत्तर माणमधील ३२ गावांना पाणी आणि माणधील एमआयडिसी प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी केली होती. या तीन्ही मागण्या आता पूणत्वाकडे निघाल्या आहेत. माझ्या मतदारसंघातील कसपटही मी बाहेर जाऊ देणार नाही. त्यामुळे एमआयडीसी तर नाहीच नाही, असा विश्वास आ. गोरेंनी व्यक्त केला.


