maharashtra

मराठी पाट्या लावा, अन्यथा आंदोलन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन

सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊनही सातारा शहरातील अनेक दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत नाहीत. त्या इंग्रजी अक्षरांमध्ये आहेत. या संदर्भात तातडीने निर्णय व्हावा. अन्यथा व्यापक आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष राहुल पवार यांनी दिला आहे.

सातारा : सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊनही सातारा शहरातील अनेक दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत नाहीत. त्या इंग्रजी अक्षरांमध्ये आहेत. या संदर्भात तातडीने निर्णय व्हावा. अन्यथा व्यापक आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष राहुल पवार यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त सातारा यांना सादर करण्यात आले.
यावेळी शहर उपाध्यक्ष भरत रावळ, शहर उपाध्यक्ष वैभव वेळापुरे, शेख, संदीप जोंधळे, प्रशांत सोडविसे, गणेश पवार इत्यादी यावेळी उपस्थित होते.
कामगार आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की, मराठी ही आपली अस्मिता असून मराठीत मोठ्या अक्षरात पाट्या असाव्यात, असे बंधनकारक आहे. असे असताना काही दुकानांवर अजूनही इंग्रजी पाट्या आहेत. हा प्रकार मराठी अस्मितेवर घाला घालण्याचा आहे, संबंधित दुकाने आणि आस्थापना यांचे मालक यांच्याकडून योग्य ती अंमलबजावणी होत नाही. काही दुकानदारांच्या इंग्रजीमधील पाट्या याची यादी आयुक्तांना यावेळी सादर करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी अस्मितेसाठी आक्रमक आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी योग्य त्या ठिकाणी दाद मागू. तसेच या संदर्भात एक व्यापक जनआंदोलन उभे करू, असा इशारा मनसे शहराध्यक्ष राहुल पवार यांनी दिला आहे. या मागणीची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करू, असे आश्वासन सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या वतीने देण्यात आले आहे.