maharashtra

राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा सातारा येथे राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून निषेध


राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटत असताना आज सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी स्वतंत्र आंदोलन करून राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला.

सातारा : राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटत असताना आज सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी स्वतंत्र आंदोलन करून राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला.
कधी कधी मी इथे लोकांना म्हणतो, महाराष्ट्रात विशेष करुन मुंबई, ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढा, तर तुमच्याकडे पैसाच राहणार नाही. तुम्ही जे मुंबईला आर्थिक राजधानी म्हणताय ती राजधानी राहणारच नाही, असे वादग्रस्त विधान राज्यपाल कोश्यारी यांनी केले होते. त्या विधानावरून विविध स्तरातून टीका होत असतानाच सातारा येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस व आज सातारा येथे स्वतंत्रपणे आंदोलने करून राज्यपालांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुनील माने, बाळासाहेब सोळसकर, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, युवक प्रदेश उपाध्यक्ष गोरखनाथ नलवडे, अतुल शिंदे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस संगीता साळुंखे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेश सचिव स्मिता देशमुख, युवती जिल्हाध्यक्ष पूजा काळे,शशिकांत वाईकर अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष शफिक शेख, भटक्या विमुक्त सेलचे जिल्हाध्यक्ष अशोकराव जाधव, ज्येष्ठ नागरिक सेल जिल्हाध्यक्ष मोहनराव जाधव, पुनम नलावडे, वनिता नलावडे, गिरीश फडतरे, प्रशांत कुरळे, वैभव मोरे, सचिन जाधव, गणेश ताटे, विनायक बर्गे, संभाजी ताटे, स्वप्निल वाघमारे, संतोष पवार, समाधान कदम, विशाल शिर्के, मंगेश गायकवाड, ताजुद्दीन मुल्ला, सचिन जाधव, सागर पवार, सिकंदर डांगे यांनी सहभाग घेतला.
दरम्यान शिवसेनेने राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्याबरोबरच केंद्र शासनाकडून होणाऱ्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर याच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, सातारा तालुका प्रमुख अनिल गुजर, बाळासाहेब शिंदे, शिवराज टोणपे, प्रणव सावंत, राहुल गुजर, रवी भणगे, सागर धोत्रे, लक्ष्मण जाधव, सुमित नाईक यांनी सहभाग घेतला.
शिवसैनिकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्रात आलेलं काळ्या टोपीचं पार्सल परत पाठवा, अशा घोषणा यावेळी शिवसैनिकांनी दिल्या. शिवसैनिकांची खंत व्यक्त करताना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते म्हणाले, राज्यपालांनी वेळोवेळी महाराष्ट्राच्या जनभावनांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवरायांबद्दल सुद्धा बेताल वक्तव्य करणारे राज्यपाल यापूर्वीही खपवून घेतले गेले नाहीत. महाराष्ट्रातील सुधारणावादी विचारवंतांच्या बाबतीतही त्यांनी आकस बुद्धीने वक्तव्य केली आहेत. या सर्व घटनांचे संतप्त पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहेत. या घटनांवरील लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने रविवारी सुट्टीच्या दिवशी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई केली आहे हे चुकीचे आहे. महाराष्ट्रात असले प्रकार शिवसैनिक खपवून घेणार नाही. त्यामुळेच आम्ही शिवसैनिक या घटनांचा निषेध करत आहोत, असे सचिन मोहिते म्हणाले.