दहिवडी येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश जाधव यांचे बंडखोरीचे निशान
नगराध्यक्षपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष
दहिवडी नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी सर्वच पक्षातून इच्छुक उमेदवारांचे मोठ्या पातळीवर प्रयत्न सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश जाधव यांनी ऐनवेळी बंडखोरीचे निशान उभारल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात शुकशुकाट पसरला आहे.
दहिवडी : दहिवडी नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी सर्वच पक्षातून इच्छुक उमेदवारांचे मोठ्या पातळीवर प्रयत्न सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश जाधव यांनी ऐनवेळी बंडखोरीचे निशान उभारल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात शुकशुकाट पसरला आहे.
दहिवडीच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीमधून सागर पोळ, भाजपमधून माजी नगराध्यक्ष धनाजी जाधव, शिवसेनेमधून, आ. जयकुमार गोरे व शेखर गोरे यांच्या भगिनी सुरेखाताई पखाले तर भाजपच्या सूचक व अनुमोदकच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश जाधव यांनी अर्ज दाखल केले. प्रांत अधिकारी शैलेश सूर्यवंशी व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांच्या उपस्थितीत अर्जाची छाननी करण्यात आली. छाननीमध्ये चारही अर्ज वैध घोषित करण्यात आले. सध्या, निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये अपक्षाच्या पाठिंब्यासह राष्ट्रवादी ९, भाजप ५ आणि शिवसेना ३ असे नागसेवकांचे पक्षीय बलाबल आहे. अपक्षाच्या पाठिंब्यामुळे दहिवडी नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता येणारच, असे जवळपास निश्चित झाले होते. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची सख्या मोठ्या प्रमाणात वाढली. सर्वांचे एका नावावर एकमत होत नव्हते. मात्र राष्ट्रवादी पक्षातील बहुसंख्य नगरसेवकांनी सागर पोळ यांना हिरवा कंदील दाखवला. मात्र यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश जाधव खूपच नाराज झाले असून त्यांची नगराध्यक्ष होण्याची प्रबळ इच्छा होती.
त्यामुळे त्यांनी पक्षश्रेष्टींचे आदेश डावलून जाधव भावकीला सोबत घेऊन थेट माजी नगराध्यक्ष धनाजी जाधव यांच्याशी संधान करून सूचक म्हणून भाजपच्या राणी तानाजी अवघडे व अनुमोदक म्हणून उज्ज्वला अमर पवार यांनी महेश जाधव यांच्या अर्जावर सह्या करून वेळ संपण्याच्या पाच मिनिटे अगोदर अर्ज दाखल केला. त्यामुळे अचानक राष्ट्रवादीच्या गोटात शुकशुकाट पसरल्याचे चित्र दिसून आले. महेश जाधव यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीचे सत्तास्थापनेचे स्वप्न भंगणार की शिवसेनेला सोबत घेऊन राष्ट्रवादी सत्ता स्थापन करणार, याकडे दहिवडीकरांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर सुरेखाताई पखाले यांच्या मुद्यावर दोघे भाऊ, आ. जयकुमार गोरे व शेखर गोरे एकत्र येऊन सुरेखाताई पखाले यांना नगराध्यक्ष पदावरती विराजमान करणार अशी कुजबुज दहिवडी परिसरामध्ये सुरु आहे. राष्ट्रवादी पक्षातून बंडखोरी केलेले नगरसेवक महेश जाधव यांची विनवणी करून राष्ट्रवादिला एकसंघ ठेऊन नगरसेवक सागर पोळ यांना नगराध्यक्ष पदावर विराजमान करणार, याची उत्सुकताही दहिवडी करांना लागली आहे.


