maharashtra

अंबवडे येथे दरोड्याची पूर्वतयारी करणार्‍या पाच संशयितांना अटक

विविध घरफोड्यांची दिली कबुली; दि. 5 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कस्टडी

Five suspects arrested for plotting robbery at Ambawade
काही दिवसापासून खटाव तालुक्यातील वडूज परिसरात भुरट्या चोर्‍यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने वडूज पोलीस ठाण्याच्या पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. रात्रगस्त सुरू करण्यात आली होती. याच रात्रगस्तीमध्ये अंबवडे येथे पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आली.

सातारा : काही दिवसापासून खटाव तालुक्यातील वडूज परिसरात भुरट्या चोर्‍यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने वडूज पोलीस ठाण्याच्या पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. रात्रगस्त सुरू करण्यात आली होती. याच रात्रगस्तीमध्ये अंबवडे येथे पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आली.
प्रभारी पोलीस अधिकारी मालोजीराव देशमुख तसेच पोलीस अंमलदार पो. ना. दिपक देवकर, पो. ना अश्विनी घार्गे, पो.कॉ. दर्‍याबा नरळे, पो.कॉ. संदीप शेडगे, आण्णाराव मारेकर असे दिनांक 1 फेब्रुवारी रोजी रात्री पेट्रोलिंग करीत असताना अंबवडे ता. खटाव गावच्या हद्दीत डॅम फाटा येथे पाच पुरुष व चार महिला असे दोन मोटार सायकलसह रस्त्याचे कडेला संशयितरित्या थांबल्याचे दिसले. त्यांना वडूज पोलीसांची चाहूल लागताच ते पळू लागल्याने पोलीसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यापैकी पुरुष व महिला पकडून त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांच्या ताब्यात दरोडा टाकण्यासाठी एक सुरा, एक चाकू, स्क्रू ड्रायव्हर, पोपट पान्हा असे साहित्य मिळून आले. तसेच इतर 2 पुरुष व 1 महिला त्यांचेकडील मोटारसायकलवरुन मोठ्या शिताफीने पळून गेले.
ही टोळी दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीत असताना सापडल्याने त्याबाबत वडूज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सातारा पोलीस अधीक्षक अजय बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदशानाखाली या संशयितांकडे कसून चौकशी केली असता या आरोपीनी वडूज पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशवाडी, दातेवाडी, कानकात्रे, निमसोड या गावी तसेच मसूर, कवठे ता. कराड व अतित ता. जि. सातारा येथे घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली आहे. लवकरच इतर फरारी आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास तपास अधिकारी पी आर दिक्षित यांनी सांगितले. दरम्यान, या गुन्ह्यातील संशयितांस दि.5फेब्रुवारी रोजी पर्यंत पोलीस कस्टडी मंजूर झाली आहे.
चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी सोन्याची चैन, लहान तीन अंगठ्या, नथ, वेढणे अंगठी, चांदीचे पैंजण तीन जोड इत्यादी दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या आरोपींविरुध्द कर्जत, अहमदनगर, पारनेर, पाटोदा, बीड येथील चोरी, घरफोडी, दरोडे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मागील काही दिवसापासून वडूज परिसरात चोर्‍याचे प्रमाणात वाढ झाल्याने नागरीकामध्ये भितीचे वातावरण झाले होते. अशाच प्रकारचे चोरीचे प्रकार घडल्यास न घाबरता तात्काळ पोलीस ठाणेस कळविण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.