maharashtra

विघ्नहर्ता गणरायाला भक्तीपूर्ण निरोप

पहाटेपर्यंत मिरवणुका ; साताऱ्यात १७३ मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन

बाप्पा बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात ढोल ताशांच्या दणदणाटात, गुलाल फुलांची उधळण करत, फटाक्यांच्या आतषबाजीत, पारंपारिक ढोलताशांच्या निनादात जिल्ह्यात सार्वजनिक व घरगुती बाप्पांना निरोप दिला.

सातारा : बाप्पा बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात ढोल ताशांच्या दणदणाटात, गुलाल फुलांची उधळण करत, फटाक्यांच्या आतषबाजीत, पारंपारिक ढोलताशांच्या निनादात जिल्ह्यात सार्वजनिक व घरगुती बाप्पांना निरोप दिला. सातारा शहरात १७३ मंडळांच्या मूर्तींचे तब्बल 15 तास सुरू असलेल्या मिरवणुकीची सांगता शनिवारी सकाळी मानाचा शंकर पार्वती गणेशच्या विसर्जनने सकाळी 7 वाजता झाली.
गणेश विसर्जन मिरवणुकीचे युवा वर्गाला मोठे अप्रूप होते. तरुणाई पावसात चिंब होवून बेधुंदपणे युवा वर्ग नाचताना दिसत होता. मिरवणुकीत डॉल्बीसह करंट ढोल, ढोल ताशा, नाशिकचा बाजा, बेंजो, बँड, हलगी पथक, झांज पथक यांचाही समावेश होता. मराठी व हिंदी गाण्यांवर युवक युवतींनी यावेळी चांगलाच ठेका धरला होता. गणेशोत्सव मिरवणूक आकर्षणाचा केंद्रबिंदू असल्याने विविध मंडळे आपले वेगळेपण दाखवून देत होते. त्यानुसार विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भगव्या टोप्या, फेटे, उपरणे परिधान करून आपली वेगळी परंपरा जोपासली. तसेच डॉल्बी, झांज पथकांचा निनाद, नाशिकचा बाजा, ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, डोळे दिपवणारा लेझर शो, मर्दानी खेळ, धनगरी नृत्य आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. जिल्ह्याच्या सर्वच भागामध्ये किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता शांततेत मिरवणूक पार पडली. सातारा शहरातील मुख्य मिरवणुकीस चांदणी चौक राजवाडा येथून सायंकाळी 4 वाजता प्रारंभ झाला. त्यानंतर शिवाजी उदय मंडळ मिरवणुकीत सहभागी झाले. आकर्षक फुलांनी सजवलेल्या पालखीत गणेशमूर्ती ठेवण्यात आली होती. मोती चौकात विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे मिरवणुकीत सामील झाली. शहरातील महागणपती सम्राट, पंचमुखी गणेश मंदिर ट्रस्ट, व्यापारी, छ. प्रतापसिंह मंडळ,  यासह विविध गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुका सकाळीच सुरू झाल्या होत्या. या मंडळाच्या गणेश मूर्तींसमोर रांगोळीचा सडा टाकण्यात येत होता. मिरवणुकीत शहरासह उपनगरातील विविध मंडळे सहभागी झाली होती. विसर्जन मिरवणुकीत गुलालाची उधळण करण्यात आल्याने मिरवणूक मार्ग गुलालाने माखला होता. रात्री उशिरा विद्युत रोषणाई केलेली मंडळे मिरवणुकीत दाखल झाली. त्यामुळे सारा परिसर उजळून निघाला होता. विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती. मोती चौकात गर्दी मोठ्या प्रमाणात झाल्याने काही काळ पोलिसांची दमछाक झाली.
यादरम्यान मुसळधार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे गणेश भक्तांची, मंडळांच्या कार्यकर्त्यांची एकच तारांबळ उडाली. परंतु, अनेक पाऊस येणार असा अंदाज लावून रेनकोट व छत्री घेवूनच आले होते. विसर्जन मिरवणुकीदरम्यान सुरूवातीला गणेशभक्तांची गर्दीही नेहमीपेक्षा कमी प्रमाणात दिसत होती. मात्र, सायंकाळी 7 नंतर मोठ्या प्रमाणात शहरातील प्रमुख मार्गावर गणेशभक्तांचा जनसागर लोटला. पावसाच्या धारा कमी झाल्यानंतर मिरवणुकीला आणखी रंगत आली. हलक्या सरी अंगावर घेत डॉल्बीच्या दणदणाटामध्ये युवा वर्ग आणि महिलांनी ताल धरला होता. त्यामुळे भर पावसातही अनेकांनी मिरवणूकीचा आनंद लुटला. यावर्षी पहिल्यांदाच महिला व युवती मोठ्या प्रमाणात विविध मंडळांच्या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. शहरातील बहुतांश मंडळांनी पारंपारिक वाद्यांचा वापर केला होता.सातारकरांचे श्रध्दास्थान असलेल्या  शंकर पार्वती या मानाच्या गणपतीच्या मूर्तीचे सकाळी 7 वाजता बुधवार नाक्यावरील नगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तळ्यावर  विसर्जन झाले. या मूर्तीच्या विसर्जनानेच मिरवणुकीची सांगता झाली. राजवाडा, राजपथ, मोतीचौक, देवीचौक, सम्राट चौक, पोवईनाका, राधिका चौक, यासह सर्वच मुख्य रस्त्यावर गणेशभक्तांचा महापूर लोटला होता. विसर्जन मार्गावर सीसीटिव्ही कॅमेर्‍याद्वारे पोलिसांनी करडी नजर ठेवली होती. मिरवणुकीवर जिल्हा पोलिस प्रमुख अजयुकमार बन्सल यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांचेही लक्ष होते. दरम्यान, फुटका तलाव, मंगळवार तळे, मोती तळ्यावर गणपती विसर्जनासाठी बंदी केली असली तरी त्या परिसरात नगरपालिकेच्यावतीने कृत्रिम हौद तयार करण्यात आले होते. त्या ठिकाणी भाविकांनी गणपतीचे विसर्जन केले. बुधवार नाक्यावरील महाकाय कृत्रिम तळे व राजवाडा  येथील पोहण्याचा तलाव, गोडोली, हुतात्मा उद्यान, सदरबझार, संगम माहुली, वर्ये येथील वेण्णा नदीवर शहर परिसरातील नागरिकांची गर्दी झाली होती. तसेच ठिकठिकाणच्या विहिरी व तळ्यात विसर्जन करण्यात आले.