maharashtra

उसाच्या फडाला लागलेल्या आगीत बालिकेचा भाजून मृत्यू

बनवडीतील दुर्दैवी घटना : 11 महिन्याच्या चिमुरडीचा अंत, परिसरात हळहळ

Girl burnt to death in sugarcane fire
बनवडी येथील ऊस तोडण्यासाठी सांगली जिल्ह्यातील एका साखर कारखान्याची ऊस तोड मजुरांची टोळी गावात आली आहे. मंगळवारी ऊस तोड मजूर गावातील एका शेतकऱ्याच्या उसाची तोडणी करण्यासाठी गेले होते. या मजुरांपैकी सोमय्या वरवी यांना 11 महिन्याची नंदिनी नावाची मुलगी होती. सोमय्या यांच्या पत्नीने ऊस तोडणी सुरू असताना नंदिनीला झोळीत झोपवून ती फडात गेली.

कराड : बनवडी, ता. कराड येथे उसाच्या फडात पाचोळ्याला लागलेल्या आगीत झोळीत झोपवलेल्या 11 महिन्याच्या बालिकेचा भाजून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवार दि. 15 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. नंदिनी सोमय्या वरवी रा. निलपाणी, ता. चोपडा, जि. जळगाव असे भाजून मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बनवडी येथील ऊस तोडण्यासाठी सांगली जिल्ह्यातील एका साखर कारखान्याची ऊस तोड मजुरांची टोळी गावात आली आहे. मंगळवारी ऊस तोड मजूर गावातील एका शेतकऱ्याच्या उसाची तोडणी करण्यासाठी गेले होते. या मजुरांपैकी सोमय्या वरवी यांना 11 महिन्याची नंदिनी नावाची मुलगी होती. सोमय्या यांच्या पत्नीने ऊस तोडणी सुरू असताना नंदिनीला झोळीत झोपवून ती फडात गेली.
त्यानंतर सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सर्व मजूर ऊस तोडणीच्या कामात व्यस्त असताना अचानक नंदिनीला झोळीत ठेवलेल्या ठिकाणच्या पाचोळ्याला आग लागल्याचे ऊस तोड मजुरांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन पाचोळा विझविला. परंतु, या आगीत 11 महिन्यांची नंदिनी भाजून गंभीर जखमी झाली होती. मजुरांनी तिला तात्काळ उपचारासाठी मलकापूर येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तीचा मृत्यू झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबतची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली असून याप्रकरणी हवालदार देशमुख अधिक तपास करीत आहेत.