maharashtra

पश्चिम महाराष्ट्राच्या साखर पट्ट्यात पुन्हा निवडणुकीचे वारे

सातारा जिल्हयात 'किसन वीर'सह 'रयत', 'अजिंक्यतारा' व लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू

election in the sugar belt of western Maharashtra
जिल्ह्यातील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यासह आणखी तीन कारखान्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये रयत-अथनी शुगर (कराड), लोकनेते बाळासाहेब देसाई (पाटण) व अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना (शेंद्रे) यांचा समावेश आहे.

सातारा : जिल्ह्यातील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यासह आणखी तीन कारखान्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये रयत-अथनी शुगर (कराड), लोकनेते बाळासाहेब देसाई (पाटण) व अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना (शेंद्रे) यांचा समावेश आहे. त्यापैकी पाटणचा कारखाना हा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे, तर अजिंक्यतारा कारखाना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे आहे. ‘रयत’ हा काँग्रेसचे नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या गटाचा आहे. त्यामुळे हे तीनही कारखाने बिनविरोध होण्यासाठी या नेत्यांना लक्ष द्यावे लागणार आहे.
सातारा जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांची निवडणूक होत आहे. त्यामध्ये किसन वीर सहकारी साखर कारखान्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. या कारखान्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारपासून (ता. २८) सुरू झाली आहे. या निवडणुकीत वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी पॅनेल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तर कारखान्याचे माजी अध्यक्ष मदन भोसले यांचे पॅनेलही रिंगणात असणार आहे. त्यासोबतच आता शिवसेनाही निवडणुकीच्या प्रक्रियेत असून त्यांनी काही मुद्द्यांवर समविचारींना पाठिंबा देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे शिवसेनेची भूमिकाही लवकरच समजणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज एक एप्रिलपासून जिल्ह्यातील आणखी तीन कारखान्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामध्ये रयत-अथणी शुगर, लोकनेते बाळासाहेब पाटील सहकारी साखर कारखाना आणि अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे. त्यातील अजिंक्यतारा कारखान्याची निवडणूक आत्तापर्यंत बिनविरोध होत आली आहे. यावेळेसही कारखाना बिनविरोध होण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून प्रयत्न होणार आहेत. रयत-अथणी शुगरचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर आहेत. मागील वेळी या कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली होती. आता यावेळेसही बिनविरोध करण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे.
आतापर्यंत लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याची निवडणूकच झाली आहे. मागील वेळी सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी सभासदांचे पॅनेल रिंगणात होते. पण, ते स्वत: निवडणूक रिंगणात नव्हते. त्यापूर्वीच्या निवडणुकीत मात्र, पाटणकर स्वत: निवडणुकीत सहभागी झाले होते. मागील निवडणुकीत त्यांच्या पॅनेलला यश मिळाले नाही. उलट गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्वच्या सर्व जागा चांगल्या फरकाने जिंकल्या होत्या. त्यामुळे यावेळेस पुन्हा सत्यजितसिंह पाटणकर पॅनेल टाकणार काय, याची उत्सुकता आहे. तर दुसरीकडे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे यावेळेस निवडणूक बिनविरोध करण्यात यशस्वी होणार का, याची उत्सुकता आहे.