राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला.
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला.
राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानाबाहेर घडलेला प्रकार म्हणजे केवळ एसटी कर्मचाऱ्यांची निदर्शने किंवा आंदोलन नव्हते तर तो अत्यंत नियोजनपूर्वक केलेला हल्ला होता. जय श्रीराम च्या घोषणा देत चप्पलफेक दगडफेक करत घरात घुसून पाहणारे लोक आंदोलन असू शकत नाहीत, हल्ले करत असू शकतात. पोलिसांनी तातडीने परिस्थिती हाताळली नसती तर ते हल्लेखोर शरद पवार यांच्या निवासस्थानी घुसले असते. या संपूर्ण प्रकाराचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पोवई नाका येथे जाहीर निषेध आंदोलन करण्यात येत आहे.
आंदोलनानंतर प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना जिल्हाध्यक्ष सुनील माने म्हणाले, या कृत्यामागे केवळ वकील सदावर्ते असू शकत नाही. सदावर्ते यांनी भाजपच्या ज्या ज्या नेत्यांचे आभार मानले ते ही या हल्ल्याला जबाबदार असू शकतात. देशात ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार नाही, तिथे अराजक माजवणे हा भाजपचा प्रयत्न आहे. दिल्लीमध्ये साडेसातशे शेतकरी मृत्युमुखी पडले त्यावेळी थोबाड बंद ठेवून आता एसटी कामगारांच्या आत्महत्यांची त्यांना पाझर फुटला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. मुळातच एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरण व्यतिरिक्त सगळ्या मागण्या मान्य झालेला असताना भाजपच्या स्वार्थी राजकारणाच्या नादी लागून या राज्यातील जनतेचे ज्यांनी हाल सुरू ठेवले त्यांनी जनतेची सहानुभूती गमावली आहे, हेच या हल्ल्यातून स्पष्ट होते, असेही माने यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, सचिन बेलागडे, पुजा काळे, संगीता साळुंके, अतुल शिंदे, स्मिता देशमुख, राजेंद्र लावंईरे, सीमा जाधव, शशिकांत वाईकर, निवास शिंदे, नलिनी जाधव, उषाताई पाटील, वैशाली सुतार, बाळासाहेब शिंदे, सचिन जाधव, तुषार गुरव, महेश जाधव, सागर पवार, तेजस भोसले, किसन घाडगे आदी उपस्थित होते.


