वीटभट्टीवर काम करणाऱ्या मुजरांच्या मुलांसाठी सुरु झाली बिनभिंतीची शाळा
काटेवाडी येथील सर्वोदय सामाजिक संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी
वीटभट्टीवर काम करणाऱ्या मुजरांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काटेवाडी, ता. खटाव येथील सर्वोदय सामाजिक संस्थेने आनंदवन बिनभिंतीची शाळा सुरु केली आहे. संत गाडगेबाबाच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पुसेगाव येथील मुलाणी यांच्या वीटभट्टीवर ही शाळा सुरु करण्यात आली आहे. यामुळे वीटभट्टी कामगारांच्या मुलांना शिक्षणाची संधी मिळाली आहे.
पुसेगाव : वीटभट्टीवर काम करणाऱ्या मुजरांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काटेवाडी, ता. खटाव येथील सर्वोदय सामाजिक संस्थेने आनंदवन बिनभिंतीची शाळा सुरु केली आहे. संत गाडगेबाबाच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पुसेगाव येथील मुलाणी यांच्या वीटभट्टीवर ही शाळा सुरु करण्यात आली आहे. यामुळे वीटभट्टी कामगारांच्या मुलांना शिक्षणाची संधी मिळाली आहे. वीटभट्टी मजुरांसाठी कुटुंबाची उपजिविका महत्वाची असते. त्यामुळे बहुतांश मुले शाळेत न जाता आपल्या पालकांसोबत काम करताना आढळून येतात. वीटभट्टीच्या जवळपास शालेय शिक्षण नसल्याने काही मुले हुंदडत असतात. मुलांनी शिकावे, मोठे व्हावे अशी या पालकांची इच्छा असते. पण गांजलेली आर्थिक परिस्थिती पाठ सोडत नसल्याने पालकांचा नाइलाज होतो आणि ही मुले शिक्षणापासून वंचित राहतात.
सर्वोदय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जीवन सर्वोदयी (इंगळे) यांनी पुसेगावसह परिसरातील अशा मुलांना संघटीत केले. वीटभट्टी वरील प्रत्येक मुलांपर्यंत शिक्षण पोहचावे यासाठी 'आनंदवन बिनभिंतीची शाळा' हा उपक्रम सुरू केला. वीटभट्टी आवारात उभारलेल्या या शाळेत पहिल्याच दिवशी ३४ मुलांनी हजेरी लावली. यावेळी सर्व मुलांचा उत्साह व अभ्यासातील गोडी पाहून शिक्षकांसह पालकांनाही फार आनंद झाला. दरम्यान दिवाळी ते मे अखेर प्रत्येक आठवड्याच्या सोमवार ते शनिवारी मुलांची शाळा भरवली जाणार आहे. विद्यार्थ्यांना दप्तर, पाटी, पेन्सील, वही आदी शैक्षणिक साहित्य यावेळी देण्यात आले. सकाळी ११ ते दुपारी एकपर्यंत विद्यार्थ्यांचा अभ्यास, गाणी-गोष्टी सांगून त्यांना शाळेचा लळा लावला जाणार आहे. शरीर, आरोग्याची निगा याविषयी माहिती दिली जाणार आहे. शिक्षणामुळे काय होऊ शकतं याचे महत्व सांगितले जाणार आहे. शासकीय मदतीविना हा उपक्रम सुरु आहे. मदतीचे हात मिळाल्यास आणखी प्रभावी शिक्षण देता येईल, असे जीवन सर्वोदयी (इंगळे) यांनी सांगितले.
या मुलांना साक्षरतेचे धडे देण्यासाठी सर्वोदयचे कार्यकर्ते स्वयंप्रेरणेने या मुलांना विना मोबदला साक्षरतेचे धडे देतील. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. हेमलता फडतरे यांनी केले. इनामदार गुरुजींनी संत गाडगेबाबा यांचा जीवनपट थोडक्यात मांडला. पार्थ तोडकर याने खेळण्याचे साहित्य दिले. यावेळी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करताना सर्वोदयचे कार्यकर्ते, हितचिंतक सौ. जगदाळे दिपमाला, सौ. माधूरी तोडकर, उद्योजिका माधूरी भागवत, सौ. रोहिणी कचरे, देशमुख आबा, तात्याबा जगताप, किसनराव फडतरे, राजुशेठ मुलाणी, पालक, सर्व कामगार बंधू-भगिनी, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले राजेंद्र भिसे फलटण. संचालक डॉ. संदीप माळी, सोमनाथ रणनवरे आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सुत्रसंचालन माधुरी तोडकर यांनी केले. याकामी असिफ मुलाणी व राजुशेठ मुलाणी सहकार्य लाभले. आभार दिपमाला जगदाळे यांनी मानले.


