maharashtra

खा. शरद पवार यांच्या हस्ते शारदाश्रमात दि. 3 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन

‘उपरा’कार पद्मश्री लक्ष्मण माने यांची पत्रकार परिषदेत माहिती

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था सातारा या संस्थेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शारदाश्रमात दि. 3 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ‘उपरा’कार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था सातारा या संस्थेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शारदाश्रमात दि. 3 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ‘उपरा’कार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना पद्मश्री माने म्हणाले, भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था सातारा या संस्थेचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार 3 डिसेंबरला शारदाश्रम जकातवाडी येथे येत आहेत. यावेळी शारदाबाई पवार कनिष्ठ महाविद्यालय, जकातवाडी या नूतन इमारतीचे उद्घाटन, राजमाता जिजाऊ उद्योजकता विकास केंद्र या इमारतीचे भुमिपूजन व या निमित्ताने भटक्या विमुक्त जमाती संघटनेतील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा व रोजगार निर्मिती मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहणार आहेत.
यावेळी खा. श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, विठ्ठलभाई मिणीयार यांचीही उपस्थिती या कार्यक्रमास असणार आहे. दिवसभराच्या या भरगच्च कार्यक्रमामध्ये अनेक प्रश्‍नांवर चर्चा करण्यात येणार आहे. यामध्ये आश्रमशाळेतील मुलभूत प्रश्‍न, भटक्या विमुक्तांच्या रोजगारी, नोकर्‍यांचा प्रश्‍न महत्त्वाचा ठरणार आहे.
दुपारी 2 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत त्यांचे विविध कार्यक्रम शारदाश्रमात आयोजित करण्यात आले आहेत.
राजमाता जिजाऊ उद्योजकता विकास केंद्राच्या बाबत बोलताना माने म्हणाले, आश्रमशाळेत आठवी, नववीत जी मुले आहेत, विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर काही काम मिळावे, यासाठी छोटे-छोटे कोर्सेस देणार आहोत. याचबरोबर ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांच्या हाताला काम मिळावे यासाठी शारदाश्रमात गोधड्या शिवण्याचे प्रशिक्षण केंद्र सुरु करीत आहोत.  जावली, पाटण आणि सातारा तालुक्यात ही केंद्रे सुरु आहेत. त्याची विक्री पुण्यातील केंद्रामधून केली जात आहे. त्याचबरोबर जुन्या कापडापासून तयार करण्यात येणारी पायपुसणी, पडदे तसेच तत्सम वस्तू तयार करण्यात येत आहेत. त्या माध्यमातून विविध प्रकारच्या गोधड्या तयार होत असून त्या परदेशातही पाठविण्यात येणार आहेत. त्याचे प्रशिक्षण शारदाश्रमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यामुळे या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पद्श्री माने यांनी केले आहे.