देशातील उद्योगपतींची अब्जो रूपयांची वीज थकबाकी असताना त्यांना महावितरण अभय देत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला रात्रंदिवस काबाडकष्ट करणाऱ्या व देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्याची वीज तोडणी करण्याचा सपाटा सातारा जिल्ह्यातील मुजोर महावितरण अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे.
सातारा : देशातील उद्योगपतींची अब्जो रूपयांची वीज थकबाकी असताना त्यांना महावितरण अभय देत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला रात्रंदिवस काबाडकष्ट करणाऱ्या व देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्याची वीज तोडणी करण्याचा सपाटा सातारा जिल्ह्यातील मुजोर महावितरण अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. तो मुजोरपणा त्यांनी तात्काळ थांबवावा अन्यथा रयत क्रांती संघटनेचा लोकशाही मार्गाने आंदोलन उभारून हिसका दाखवावा लागेल, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी महावितरणचे अधिक्षक अभियंता यांना निवेदनाद्वारे दिला.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या सातारा जिल्ह्यात महावितरण विभागाने शेतकऱ्यांचे व गोरगरिबांचे एक महिन्याची थकबाकी जरी राहिली तरी आता ह्यांचे हात वीज तोडणीसाठी धजावू लागले आहेत. वास्तविक पाहता वीज कनेक्शन घेताना अनामत रक्कम भरण्यात आलेली असताना अशाप्रकारे तालिबानी पद्धतीने एक महिन्याची थकबाकी राहिली तरी वीज तोडणी करण्यात येत आहे. ही बाब अन्यायकारक असून हा अन्याय रयत क्रांती संघटना सहन करणार नाही.
एका बाजूला ऊस कारखानदार एक-एक वर्ष झाले तरी शेतकऱ्यांची पैसे देण्यास तयार नाही. त्यामध्ये सरकार व जिल्हाधिकारी कुठेही हस्तक्षेप करण्यास तयार नाहीत. दुसऱ्या बाजूला मात्र सरकारचाच भाग असलेल्या महावितरण मात्र शेतकऱ्यांची वीज तोडणी करण्यास येत आहे, ही बाब सरकार व जिल्हा प्रशासन यांच्यासाठी शरमेची आहे. मात्र, रयत क्रांती संघटना केवळ एवढ्यावर थांबणार नसून येत्या काळात शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शनला कोणत्याही वीज कर्मचाऱ्यांनी हात लावायचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम थेट अधीक्षक अभियंता महावितरण व ऊर्जामंत्री यांना सहन करावा लागणार, असा इशारा प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी दिला.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, विकास मोहिते, अनिल बाबर, गिरीष आवळे, अमोल शिंगटे, प्रमोद जाधव, अरुण कदम आदी उपस्थित होते.


