maharashtra

शरद पवार यांच्याबाबत वक्तव्य करताना आ. शहाजी पाटील शुद्धीत होते का? : आ. शशिकांत शिंदे


राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वक्तव्य करताना आ. शहाजी पाटील शुद्धीत होते का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी शुद्धीत राहून शरद पवार यांच्याबाबत वक्तव्य करावे, असा सल्ला विधान परिषदेचे सदस्य आ. शशिकांत शिंदे यांनी त्यांना दिला.

सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वक्तव्य करताना आ. शहाजी पाटील शुद्धीत होते का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी शुद्धीत राहून शरद पवार यांच्याबाबत वक्तव्य करावे, असा सल्ला विधान परिषदेचे सदस्य आ. शशिकांत शिंदे यांनी त्यांना दिला.

दरम्यान केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातील सत्तेचा गैरवापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह अधिकार्‍यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
पुसेगाव, ता. खटाव येथे श्री सेवागिरी महाराजांच्या रथाचे पूजन झाल्यानंतर ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. आ. शशिकांत शिंदे पुढे म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर टीका करणारे महाराष्ट्रात पुन्हा कधीच निवडून आले नाहीत, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आ. शहाजी पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली तेव्हा ते शुद्धीवर होते का मला माहीत नाही मात्र शुद्धीत राहून त्यांनी शरद पवार यांच्याबाबत वक्तव्य करावे. कोरेगाव मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीबाबत भाष्य करताना आ. शशिकांत शिंदे म्हणाले, कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मी फारसा भाग घेतला नाही. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने मतदार संघात जो बदल पाहायला मिळाला तो राज्यात सर्वत्र पाहायला मिळत आहे. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता, ही वस्तुस्थिती आहे मात्र आमच्यातूनच अनेक जण भाजपमध्ये गेले. यापूर्वीही मी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना सांगितले आहे की पुन्हा आपल्याला जोमाने काम करावे लागेल. याबाबत ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्याशी ही चर्चा झाली असून स्थानिक पातळीवर पुन्हा एकदा पक्ष संघटना बांधणीसाठी काम करावे लागेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी कधीही सत्तेचा गैरवापर होत नव्हता मात्र अलीकडच्या काळात ज्या पद्धतीने केंद्रामध्ये सत्तेचा गैरवापर होत आहे. त्याचप्रमाणे राज्यातही गैरवापर होऊ लागला आहे. एका एका अधिकार्‍याची तीन तीन वेळा बदली होत आहे. सत्तेच्या माध्यमातून लोकांना दाबण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह अधिकार्‍यांमध्ये या सरकार बाबत प्रचंड नाराजी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.