निवड समितीनंही राजीनामा फेटाळला
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आग्रहानंतर शरद पवारांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे.
शरद पवार म्हणाले, “मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तीव्र भावना उमटल्या. तसेच मी निर्णयाचा पुनर्विचार करावा म्हणून माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटीत होऊन एकमुखाने आवाहन केलं.”
“…म्हणून मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे”
“माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहनं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत त्यांनी घेतलेला निर्णय याचा विचार करून मी पुन्हा अध्यक्षपदी रहावे या निर्णयाचा मान राखून राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे,” असंही शरद पवारांनी नमूद केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवड समितीनं शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला आहे. शरद पवारांनी लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याची घोषणा केली होती. यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. शरद पवारांनी निर्णय जाहीर केल्यानंतर नेते आणि कार्यकर्त्यांना धक्का बसला होता. शरद पवारांनी पुढील निर्णय घेण्यासाठी समिती निवडली होती. त्या समितीनं पुढील निर्णय घ्यावा असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र, आज झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी अध्यक्षपदावर राहावं, असं सांगत राजीनामा फेटाळण्यात आला आहे.
निवड समितीच्या बैठकीत निर्णय
प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी.सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड , एकनाथ खडसे, फौजिया खान, अध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, धीरज शर्मा, अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, सोनिया दूहन यांची आज बैठक झाली. या बैठकीत शरद पवारांचा राजीनामा फेटाळण्यात आला आहे.
प्रफुल पटेल यांनी प्रस्ताव मांडला
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवड समितीची बैठक आज पार पडली. आजच्या बैठकीत शरद पवार यांचा राजीनामा फेटाळण्यासंदर्भात प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल पटेल यांनी मांडला. या प्रस्तावाला मंजुरी देत निवड समितीनं शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला. शरद पवार हे अध्यक्षपदी हवेत, असा प्रस्ताव प्रफुल पटेल यांनी मांडला. या प्रस्तावाला निवड समितीनं मंजुरी देण्यात आली आहे.


