जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोर 'धार'
कोयना धरणाचे सहावक्री दरवाजे दीड फुटांनी उचलले; वीर धरणाचे दरवाजे उघडले, लोणंद- वीर मार्ग वाहतुकीस बंद
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे बहुतांश धरणे ओव्हर फ्लो झाल्यामुळे आज कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटांनी उचलले. त्यामुळे नदीपात्रात प्रति सेकंद १० हजार १०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.
सातारा : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे बहुतांश धरणे ओव्हर फ्लो झाल्यामुळे आज कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटांनी उचलले. त्यामुळे नदीपात्रात प्रति सेकंद १० हजार १०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. दुसरीकडे वीर धरणातून निरा नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. वाठार कॉलनी - वीर दरम्यानचा नीरा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे लोणंद वीर सासवड मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागाला मुसळधार पावसाने झोडपणे सुरू केले आहे. दिवसभरात सातत्याने पावसाच्या मोठ्या सरी कोसळत असल्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. पाटण तालुक्यातील कोयना धरणात शुक्रवारी सकाळी ८७.६० एवढा टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सध्या तरी प्रतिसेकंद सरासरी ५० हजार क्यूसेक पाण्याची आवक सुरू असून पुराची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने आज सकाळी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटांनी उचलण्यात आले आहेत. त्यामुळे कोयना नदी नदीपात्रात प्रति सेकंद १० हजार १०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसामुळे पाण्याची आवक वाढली तर यापेक्षा अधिक जादा पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.
दुसरीकडे खंडाळा तालुक्यातील वीर धरण १०० टक्के भरले असून वीर धरणातून ४२ हजार ९३३ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वाठार कॉलनी- वीर दरम्यानचा नीरा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे लोणंद-वीर सासवड मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. वीर धरणातून पाणी सोडल्यामुळे निरा दत्त घाटावरील दत्त मंदिरही पाण्याखाली गेले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदीपात्रात कोणीही जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.


