पाटण तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून
नराधम आरोपी जेरबंद : जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ
रुवले (सुतारवाडी) ता. पाटण येथे एका नराधमाने सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केला. तसेच मृतदेह डोंगरातील ओढ्यात टाकून दिला. बुधवारी 29 रोजी दुपारच्या सुमारास घडलेली घटना गुरूवारी ३० रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. ढेबेवाडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 12 तासाच्या आत नराधम संशयित आरोपीला अटक केली आहे.
पाटण : रुवले (सुतारवाडी) ता. पाटण येथे एका नराधमाने सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केला. तसेच मृतदेह डोंगरातील ओढ्यात टाकून दिला. बुधवारी 29 रोजी दुपारच्या सुमारास घडलेली घटना गुरूवारी ३० रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. ढेबेवाडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 12 तासाच्या आत नराधम संशयित आरोपीला अटक केली आहे.
संतोष चंद्रु थोरात रा. रुवले (सुतारवाडी) असे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संतोष थोरात हा बुधवारी २९ रोजी दुपारच्या सुमारास वैरण आणण्याच्या बाहाण्याने अल्पवयीन मुलीला सोबत घेऊन जवळच्या शिवारात गेला. संशयित नराधम आरोपींने तिच्यावर अत्याचार केला. तसेच पीडितेचा गळा आवळून खून करून डोंगरातील ओढ्यात तिचा मृतदेह टाकून दिला.
सायंकाळच्या सुमारास मृत पीडित अल्पवयीन मुलीच्या आज्जीला मुलगी घरात नसल्याचे निदर्शनास आले. मुलीच्या आज्जीने याबाबतची माहिती कुटुंबीयांसह ग्रामस्थांना दिली. त्यानंतर शोधाशोध सुरु करण्यात आली. परंतु, ती मिळून आली नाही. त्यामुळे सुरुवातीला बिबट्याने मुलीवर हल्ला केला असावा? असा संशय ग्रामस्थांना आल्याने पुन्हा त्यादृष्टीने शोधाशोध सुरु झाली. मात्र, तरीही मुलगी सापडली नाही. त्यानंतर मात्र घटनेची तक्रार ढेबेवाडी पोलिस ठाण्यात देण्यात आली.
याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ढेबेवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांना सोबत घेऊन आसपासचा परीसर पिंजून काढला. विशेष म्हणजे या शोध मोहिमेत पोलिसांसोबत संशयित नराधम आरोपीही सामील झाला होता. दरम्यान, पीडितेचा शोध सुरु असताना पोलिसांनी पिडीतेच्या घराशेजारील नथुराम सुतार यांच्या घरावर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. त्यामध्ये संबंधित नराधम आरोपी अल्पवयीन मुलीला घेवून गेल्याचे दिसून आले. त्यावरून पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी आरोपीला ताब्यात घेवून पोलीसी खाक्या दाखवला. त्यानंतर संशयित नराधम आरोपी संतोष थोरात याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास पोलिसांना पीडित मुलीला मारुन टाकलेले ठिकाण दाखवले. पीडितेच्या घरापासून सुमारे 500 मीटर अंतरावर ओढ्यात टाकलेला मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.
दरम्यान, या घटनेने रुवलेसह (सुतारवाडी) ढेबेवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, कराड उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे किशोर धुमाळ यांनी घटनास्थळी भेट दिली.


