अमरनाथ येथे दोन दिवसांपूर्वी अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाली. यामध्ये असंख्य लोक अडकले. त्यांना वाचवण्यासाठी प्रशासनाकडून बचावकार्य सुरु आहे. याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमातून प्रसारित होताच अनेकांनी या जम्मू-काश्मिर येथील अमरनाथ यात्रेसाठी गेलेले सातारकर यांच्याशी मोबाईलवरुन थेट संपर्क साधला. त्यावेळी सर्वजण सुरक्षित असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
सातारा : अमरनाथ येथे दोन दिवसांपूर्वी अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाली. यामध्ये असंख्य लोक अडकले. त्यांना वाचवण्यासाठी प्रशासनाकडून बचावकार्य सुरु आहे. याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमातून प्रसारित होताच अनेकांनी या जम्मू-काश्मिर येथील अमरनाथ यात्रेसाठी गेलेले सातारकर यांच्याशी मोबाईलवरुन थेट संपर्क साधला. त्यावेळी सर्वजण सुरक्षित असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
सातारा येथील नगरसेवक अमोल मोहिते, राजू गोरे, भालचंद्र, निकम, जनार्दन जगदाळे, रवि माने यांच्यासह १६ जण साताऱ्यातून ४ जुलै रोजी अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले होते. पण दोन दिवसांपूर्वी अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाल्याने अमरनाथ यात्रा रद्द करुन पुढे लेह लदाख येथून काश्मिर श्रीनगर येथे आले होते.
श्रीनगर येथील परिसरातील पर्यटनाची ठिकाणे पाहिल्यानंतर रविवार, दि. १0 रोजी सकाळी अमरनाथ यात्रेकडे जाण्याचे बुकिंग होते. त्यानुसार रविवारी सकाळी अमरनाथ यात्रेच्या दर्शनासाठी निघाले. मात्र पुढे बालटन येथे गेल्यानंतर दोन दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीमुळे रेस्क्यु टीमचे ऑपरेशन आजही सुरु आहे. तेथील स्थिती पाहता अमरनाथ दर्शनासाठी पुढे कोणालाही सोडले जात नाही. त्यामुळे पुन्हा सर्व सातारकर श्रीनगर येथे आले आहेत. तेथून पुढे गुलमर्ग येथे जाणार असून त्यानंतर पुढे १४ जुलै रोजी सातारा येथे पोहोचणार आहेत.
जम्मू काश्मिर येथील बर्फाळ प्रदेशात शक्यतो उन्हाळी यात्रा व सहली काढल्या जातात. किंबहुना त्या बर्फाच्छादित प्रदेशात जाण्यासाठी उन्हाळ्याचा कालावधी योग्य असतो. मात्र, त्या प्रदेशात कार्यरत असणाऱ्या टुरिझम कंपन्यांची बुकींग फुल्ल असेल तर अपेक्षीत महिन्यात त्या ठिकाणी पोहोचणे अवघड होते. जम्मू काश्मिर खोऱ्यात पर्यटनासाठी अनेक स्थळे असली तरी सातारा जिल्ह्यातून वैष्णोदेवी येथे जाणाऱ्या भाविकांची मोठी संख्या आहे. गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यातील अनेकजण जम्मू काश्मिर पर्यटनाची सैर करुन आले आहेत.
अमरनाथ येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीने साताऱ्यात असणाऱ्या कुटुंबियाच्यात धडकी भरली होती. त्यांनी तत्काळ आपत्कालीन विभागासह प्रवासात असलेल्या सर्वांशी संपर्क साधला असता सर्वजण सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांच्या परिवाराचा जीव भांड्यात पडला.


