कॉलेजच्या मुलांना मारहाण केल्याप्रकरणी तिघेजण निलंबित
अपर पोलीस अधिक्षक बोऱ्हाडे यांची माहिती; कॉलेजने मुलांच्या बेशिस्तीलाही रोखण्याची गरज
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी दोन पोलीस कर्मचारी व एक होमगार्ड अशा तिघांना निलंबित केले असल्याची माहिती अपर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे यांनी दिली.
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी दोन पोलीस कर्मचारी व एक होमगार्ड अशा तिघांना निलंबित केले असल्याची माहिती अपर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे यांनी दिली. महाविद्यालयाच्या होस्टेलवर ही घटना घडली असून रहिवासी वस्तीत असलेल्या होस्टेलमधील विद्यार्थ्यांना देखील महाविद्यालयाने शिस्तीचे पाठ घालून दिले पाहिजेत, अशी भावना परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी शिरवळ येथील क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या होस्टेलवर विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरु असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. यावेळी तिथे रात्रगस्तीवर असलेले दोन पोलीस कर्मचारी व होमगार्ड पोहोचले. तिथे होस्टेलच्या टेरेसवर विद्यार्थी गोंधळ करत असल्याचे निदर्शनास आल्यावर पोलिसांनी हटकल्यावर विद्यार्थ्यांनीच आणखी गोंधळ घालण्यास आरंभ केला. तेव्हा हातातील काठीने काही विद्यार्थ्यांना फटके बसले ही घटना आहे.
त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना देखील त्यांची चूक लक्षात आल्यावर त्यांनी अशा प्रकारचे वर्तन न करण्याची ग्वाही दिली होती, तर शिरवळमधील नगरसेवकाने देखील या प्रकरणात मध्यस्थी करुन पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी चर्चा घडवून आणून हे प्रकरण मिटवले होते. मात्र, त्यानंतर विद्यार्थ्यांनी सोशल मिडियावर मारहाणीचे फोटो व्हायरल केल्यानंतर हे प्रकरण पुन्हा समाज पटलावर आले. पोलिसांकडून अमानूषपणे मारहाण केल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे समोर आल्याने त्याची दखल घेत पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी दोन पोलीस कर्मचारी व एक होमगार्ड यांना निलंबित करुन या घटनेची चौकशी करण्याचे आदेश वाई व फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती शुक्रवारी अपर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे यांनी दिली आहे.
राज्यात काही ठिकाणी मारहाणीचा निषेध
पशुवैद्यकीय महाविद्यालयातील होस्टेलमधील विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचे वृत्त शुक्रवारी राज्यभर व्हायरल झाल्यावर काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन करत पोलिसांच्या या मारहाणीचा निषेध करत कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणाची चौकशी होणार असल्याने यातील सत्य बाहेर येईलच.
विद्यार्थ्यांना शिस्तीची आवश्यकता
शिरवळ येथील क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय नागरी वस्तीत आहे. तिथे विद्यार्थी रहात असल्याने थोडाफार दंगा होणार, असे नागरिकांनी गृहीत धरलेले असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचा रात्री अपरात्रीही गोंधळ वाढला होता. या होस्टेलसमोर असलेल्या नागरी वसाहतीत अनेक कामगार व त्यांचे कुटुंबिय रहात असतात. विद्यार्थ्यांच्या गोंधळाचा त्यांना त्रासही होत असतो. ही मारहाण केल्याची घटना ज्या दिवशी घडली. त्या दिवशी काही विद्यार्थ्यांनी मद्यपान केले असल्याचे व होस्टेलच्या टेरेसवर पार्टी करुन गोंधळ घालत असल्याचेही समोर येत आहे. त्यामुळे महाविद्यालयीन व्यवस्थापनाने अशा गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यांना शिस्तीचे पाठ घालून देण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून तपास सुरु
घटनेदिवशी नेमके काय घडले याचा तपास करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी दिले असून दोन वरिष्ठ अधिकारी या घटनेच्या अनुषंगाने चौकशी व तपास करत आहेत. प्राथमिक चौकशीत होस्टेलवर मुलांचा दंगा सुरु असल्याची तक्रार आल्यानंतर पोलीस गेले होते. त्यावेळी नेमके काय काय घडले हे चौकशीत आता समोर येर्इल, असेही अपर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे यांनी सांगितले.


