maharashtra

शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी खावली येथील जागा द्यावी!

खा. उदयनराजे यांची जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी

Provide space at Khawli for Shivaji University sub-center!
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना उपकेंद्रासाठी खावली येथील जागा उपलब्ध होणेबाबत संबंधीत विभागाच्या प्रशासकीय विभागांची येत्या आठवडयात बैठक घेवून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी आम जनतेच्या वतीने विशेष विनंती केली.

सातारा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र शिवाजी विद्यापीठाच्या आजी माजी विद्यार्थ्याच्या हिताचे असल्याने ते व्हावे अशी सर्वांचीच इच्छा आहे. शिवाजी विद्यापीठाने देखिल उपकेंद्र सुरु करण्यास तत्वतः मान्यता दिली आहे. मागे एकदा उपकेंद्रासाठी खावलीची जागा पहाणी झालेली आहे. आता कुठे नेमके अडले आहे नमुद करुन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना उपकेंद्रासाठी खावली येथील जागा उपलब्ध होणेबाबत संबंधीत विभागाच्या प्रशासकीय विभागांची येत्या आठवडयात बैठक घेवून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी आम जनतेच्या वतीने विशेष विनंती केली.
याबाबत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी यांना यासंदर्भातील लेखी निवेदन देताना स्पष्ट केले की, सातारा जिल्हा कोल्हापूरशी जवळ असल्याने, कोल्हापूर, सांगली, सिंधुदूर्ग या जिल्ह्यातील विद्यार्थ्याच्या करीता, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी श्री शिवाजी विद्यापीठ संलग्न करण्यात आलेले आहे. या विद्यापीठामधुन भारतातील जवळजवळ सर्व अभ्यासक्रम अत्यंत चांगल्या पध्दतीने महाविद्यालयांच्या माध्यमातुन शिकवले जातात. विश्‍वविद्यालयाशी एकदा विद्यार्थी जोडला गेला की, त्याचे शिक्षण चालु असताना किंवा झाल्यावर देखिल विश्‍वविद्यालयाशी नेहमीच संपर्क करावा लागत असतो. मायग्रेशन, सर्टीफिकेट, मार्कशिट असेल अश्या विविध कारणाकरीता विश्‍वविद्यालयाशी सर्वच आजी माजी विद्यार्थी असलेल्या सर्वांचा संबंध येत असतो. 
या पार्श्‍वभुमीवर सातारा येथे उपकेंद्र झाल्यास, श्री शिवाजी विश्‍वविद्यालयाशी सर्व कामकाज सातारा उपकेंद्रामधुन होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालक, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर सेवक वर्ग यांना ज्यावेळी जावे लागेल ते सातारा येथील उपकेद्रामध्ये जावे लागेल, त्यामुळे, विद्यार्थ्यांचा आणि महाविद्यालयांचा, वेळ, पैसा, श्रम या तीनही गोष्टी वाचणार आहेत. 
कालच आम्ही शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के, प्र. कुलगुरु डॉ. पी. एच. पाटील, कुलसचिव व्ही. डि. नांदवडेकर, अमित कुलकर्णी आणि अन्य मान्यवरांबरोबर कोल्हापूर येथे श्री शिवाजी विद्यापीठामध्ये चर्चा केली आहे. तत्कालीन कुलगरु आदणीय डॉ. देवानंद शिंदे यांनी उपकेंद्रास तत्वतः मान्यता देखिल दिली आहे. जागा उपलब्ध होणे महत्वाचे आहे. शैक्षणिक चांगल्या कार्यास आणि श्री शिवाजी विद्यापीठास जागा देण्याबाबत कोणतीही समस्या उद्भवली जाणे शक्य नाही. त्यामुळे या बाबीला प्राधान्य देवून, पुढील आठवडयात खावली येथील जागा, उपकेंद्राकरीता देणेबाबत संबंधीत विभागाच्या प्रशासकीय अधिकार्‍यांची बैठक बोलवावी आणि जागा उपलब्ध करुन देणेबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी विनंती सूचना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली.
पुढील आठवडयात संबंधीतांची बैठक घेवून सकारात्मक कार्यवाही करु, असे यावेळी जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. निवेदन देताना अमित कुलकर्णी, रॉबर्ट मोझेस, ऍड.डि.जी.बनकर, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, ऍड. विनीत पाटील, यांचेसह बहुसंख्य नागरीक,कार्यकर्ते उपस्थित होते.