maharashtra

जिल्ह्यात विविध गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांतील सहाजण तडीपार


Six members of two gangs involved in various crimes in the district were deported
जिल्ह्यामध्ये विविध गुन्हे करणाऱ्या दोन टोळीतील सहा जणांना तडीपार करण्यात आले आहे. प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी ही कारवाई केली असून नवीन वर्षातील ही पहिलीच मोठी कारवाई समजली जाते.

सातारा : जिल्ह्यामध्ये विविध गुन्हे करणाऱ्या दोन टोळीतील सहा जणांना तडीपार करण्यात आले आहे. प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी ही कारवाई केली असून नवीन वर्षातील ही पहिलीच मोठी कारवाई समजली जाते.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, दुखापत करून दरोडा, जबरी चोरी, पेट्रोल चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या टोळीचा प्रमुख राकेश उर्फ सोन्या भगवान भंडलकर वय २१, रा. तांबवे, ता. फलटण, सौरभ संजय जगताप वय २१, रा. सालपे, ता. फलटण यांना जिल्ह्यातून तडीपार करण्याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावानुसार अजय बन्सल यांनी वरील दोघांना दोन वर्षाकरता सातारा जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, भोर तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून हद्दपार केले आहे.
उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाकरिता अपहरण, गर्दी मारामारी, मालमत्तेस धोका निर्माण होईल असे गुन्हे करणाऱ्या अक्षय शंकर पाटोळे वय ३०, रा. पाटोळेवस्ती, शिरसवडी, ता. खटाव हल्ली रा. खडकपेठ, मसुर, ता. कराड, राहुल चंद्रकांत जाधव वय २१, शरद संजय चव्हाण वय २१, प्रसाद श्रीरंग जाधव वय २० सर्व रा. मसुर, ता. कराड या चौघांना जिल्ह्यातून तडीपार करण्याबाबत पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी अजय बन्सल यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार त्यांना सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, वाळवा, शिराळा या तालुक्यातून एक वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे. तडीपार केलेल्या संबंधित युवकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या हालचालीस प्रतिबंध न झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. अजय बन्सल यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर तडीपारीचे एकूण ३९ प्रस्ताव सादर झाले. त्यामध्ये ९८ जणांना तडीपार करण्यात आले आहे.
याकामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्यावतीने अप्पर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सपोनि रमेश गर्जे, उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर, स्थागुशाचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पो.ना. प्रमोद सावंत, पो.कॉ. केतन शिंदे, कॉ. अनुराधा सणस यांनी या कारवाईत सहभाग घेतला.