नक्षलग्रस्त भागात गडचिरोली पोलीस दलाचे कार्य कौतुकास्पद
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई : दादालोरा खिडीकी उपक्रमाची ग्यारापत्ती येथे जावून प्रत्यक्ष केली पाहणी
गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात शासनाच्या योजना पोहचविण्यासाठी पोलीस विभागाने अनेक उपक्रम राबवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उत्कृष्ठ कार्य केले आहे. यामुळेच आता स्थानिक नागरिकांनी नक्षल विचारसारणी झुगारून त्यांना स्विकारलं असल्याचे मत राज्याचे गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी गडचिरोली येथे व्यक्त केले.
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात शासनाच्या योजना पोहचविण्यासाठी पोलीस विभागाने अनेक उपक्रम राबवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उत्कृष्ठ कार्य केले आहे. यामुळेच आता स्थानिक नागरिकांनी नक्षल विचारसारणी झुगारून त्यांना स्विकारलं असल्याचे मत राज्याचे गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी गडचिरोली येथे व्यक्त केले.
लोकशाही मुल्य रूजविण्यासाठी प्रशासनासह पोलीस विभाग नक्षलग्रस्त भागात कार्य करीत आहे. अनेक विकास कामे राबवून गरजूंना मदत करण्याचे कार्य पोलीस विभागाने गेल्या अनेक वर्षात या ठिकाणी केले आहे. गेल्या वर्षभरात एक लाखाहून अधिक आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना विविध प्रमाणपत्रे तसेच शासनाच्या योजना पोहचविण्यात आल्या. आता दादालोरा खिडकीवर नागरिकांची गर्दी पाहून चित्र स्पष्ठ होत आहे. दुर्गम भागातील नागरिकांना लोकशाही विचारसारणी, विकास आणि येथील पोलीस यांना स्विकारले आहे ही सत्यस्थिती आहे, असे प्रतिपादन दादालोरा महामेळाव्यात त्यांनी व्यक्त केले.
राज्यमंत्री देसाई यांनी ग्यारापत्ती येथील आऊट पोस्टला जावून दादालोरा खिडकी आणि जनजागृती मेळाव्यास उपस्थिती दर्शविली. या ठिकाणी त्यांनी अनेक दुर्गम भागातील स्थानिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. शासनाच्या योजना, पोलीसांचे कार्य याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर पोलीस विभागातील कर्मचारी यांच्याशी तेथील व्यवस्थेबाबत विचारपूस केली.
गडचिरोली येथे मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी वरिष्ठ अधिकारी व प्रत्यक्ष सुरक्षा व्यवस्थेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये चांगला समन्वय असल्याचे सांगितले. राज्यात अनेक ठिकाणी मी पोलीस विभागाचे कार्य पाहले आहे. मात्र, गडचिरोली येथे पोलीसांना दुहेरी भुमिका पार पाडावी लागते. आणि त्यांचे कार्य सर्व राज्यात कौतुकास्पद असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमुद केले.
यावेळी पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक, अभियान, सोमय मुंडे तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


