निगडी येथे विहिरीत पडलेल्या सांबराला जीवदान
पायामध्ये शिकारीचा फासा आढळला; उपचारानंतर सुटका
निगडी, ता. सातारा येथील एका विहिरीमध्ये पडलेल्या सांबराला तब्बल ९ तासाच्या प्रयत्नानंतर जीवदान देण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले. दरम्यान पायामध्ये शिकारीचा फासा लागून जखमी होऊन संबर विहिरीत पडल्याचा प्राथमिक निष्कर्ष असून उपचार केल्यानंतर त्याची सुखरूप सुटका केली असल्याची माहिती सातारा तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी दिली.
सातारा : निगडी, ता. सातारा येथील एका विहिरीमध्ये पडलेल्या सांबराला तब्बल ९ तासाच्या प्रयत्नानंतर जीवदान देण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले. दरम्यान पायामध्ये शिकारीचा फासा लागून जखमी होऊन संबर विहिरीत पडल्याचा प्राथमिक निष्कर्ष असून उपचार केल्यानंतर त्याची सुखरूप सुटका केली असल्याची माहिती सातारा तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, निगडी येथील शिवारात असणाऱ्या एका विहिरीमध्ये सांबर पडल्याचे ग्रामस्थांना समजताच त्यांनीही माहिती सातारा तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण यांना शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता दिली. ते तात्काळ आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तब्बल ६० फूट खोल नर जातीचा सांबर विहिरीत पडला असल्याचे लक्षात येताच त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने तात्काळ मदतकार्य सुरू केले. दोरखंड व लोखंडी जाळीचा वापर करून मदत कार्य सुरू केले. रात्री साडेनऊ वाजता सांबराला बाहेर काढण्यात यश आले.
सांबर अत्यंत घाबरलेल्या परिस्थितीत दिसून येत होते. थंडी आणि पाण्यात पडल्यामुळे ते प्रचंड कुडकुडत होते. त्याच्या अंगावर उबदार कपडे टाकून त्याला शांत करण्यात आले. तदनंतर रात्री साडेबारा वाजता त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याच्या मागील उजव्या पायात शिकारीसाठी वापरण्यात येणारा फासा अडकलेला असल्याचे निदर्शनास आले. त्वरित त्याच्या पायातील फासा काढून टाकण्यात आला, त्याचा जखमांवर मलमपट्टी करण्यात आली आणि त्याचा थकवा दूर करण्याकरिता इतर उपचार करण्यात आले. प्रथम उपचार करतात सांबर बऱ्यापैकी सावरले. तदनंतर त्याची सुटका करण्यात आली. सांबराला जीवदान देण्यात सरपंच सुभाष शामराव पवार, धनंजय बबन पवार, अण्णा मारुती जाधव, सागर प्रकाश मसुगडे, तुषार विजय पवार, प्रदीप तुळशीदास जाधव, रोहित व्यंकट पवार, महेश धनाजी भोईटे, प्रीतम आप्पासो पवार, वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी चंदन सावने, वनपाल कुशाल पावरा, वनरक्षक राजू मोसलगी, सुहास भोसले, महेश सोनवले, श्रीकांत दुर्गे, गोरखा शिरतुडे, शैलेश देशमुख, सुमित वाघ, दिपक मच्छे यांनी परिश्रम घेतले. बचावकार्य सहायक वन संरक्षक सुधीर सोनवले, उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले.
सांभर हा एक हरीण वर्गातील प्राणी असून हा भारतभरात आढळतो. या जातीचे नर प्राणी १८५ ते २६० किलो वजनाचे असतात. सप्टेंबर ते जानेवारी या काळात यांचा प्रणयकाळ दिसून येतो. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्सरवेशन ऑफ नेचर या आंतरराष्ट्रीय संस्थेने या जातीचे अस्तित्व असुरक्षित असल्याचे जाहीर केले आहे ज्या मागचे प्रमुख कारण हे मानवाचा निसर्गातील वाढता हस्तक्षेप तथा शिकार आहे.


