गावोगावच्या ज्ञानेश्वरांच्या शोधात आचार्य अॅकॅडमीची महाराष्ट्र भ्रमंती
स्पर्धा परिक्षांसाठी गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध
जिल्हा परिषदेच्या शाळेतून राष्ट्रीय पातळीवरील परिक्षांमध्ये अव्वल नंबर मिळविणारे विद्यार्थी तयार करण्याचे स्वप्न पाहणारी आचार्य अॅकॅडमीची महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात जाणारी शोधयात्रा आज साताऱ्यात पोहोचली.
सातारा : जिल्हा परिषदेच्या शाळेतून राष्ट्रीय पातळीवरील परिक्षांमध्ये अव्वल नंबर मिळविणारे विद्यार्थी तयार करण्याचे स्वप्न पाहणारी आचार्य अॅकॅडमीची महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात जाणारी शोधयात्रा आज साताऱ्यात पोहोचली.
पालकांच्या आर्थिक स्थितीमुळे बुद्धीमत्ता असतानाही अनेक विद्यार्थ्यांना योग्य संधी मिळत नाही. बारामतीच्या आचार्य अॅकॅडमीच्या स्व. रामजी राघोजी मुटकूळे ज्ञानदान योजनेअंतर्गत अशा विद्यार्थ्याना शैक्षणिक मदत आणि आवश्यक मार्गदर्शन दिले जाणार आहे. जेईई, नीट तसेच एनडीए सारख्या परीक्षांत उज्जल यश मिळविण्याची क्षमता असलेल्या २० विद्यार्थ्यांना दरवर्षी या योजनेत संधी दिली जाणार आहे. अकरावी व बारावी या दोन वर्षासाठी या विद्यार्थ्यांचा सर्व शैक्षणिक खर्च अॅकॅडमीव्दारे केला जाऊन जेईई, नीट आणि एनडीएसारख्या परीक्षांसाठी त्यांची तयारी करून घेतली जाणार आहे.
यासोबतच जिल्हा परिषदेच्या सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या १००० विद्यार्थ्यांची या योजनेअंतर्गत निवड केली जाईल. त्यांच्याशी संपर्क ठेऊन त्यांना आवश्यक मार्गदर्शन केले जाईल. या विद्यार्थ्यांचीही राष्टीय पातळीवरील परीक्षांसाठी तयारी करून घेतली जाणार आहे.
ही योजना गरजुंपर्यंत पोचण्यासाठी 'शोधयात्रा गावोगावच्या ज्ञानेश्वरांची' चे आयोजन केले गेले आहे. यानुसार आचार्य अॅकॅडमीचे प्रतिनिधी घन:श्याम केळकर हे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तेथील शिक्षण क्षेत्रातील शासकीय अधिकारी, शिक्षणतज्ञ आणि पालकांच्या भेटी घेणार आहेत. आज साताऱ्यापासुन या शोधयात्रेस सुरुवात झाली.
या योजनेच्या प्रसारासाठी आचार्य अॅकॅडमीचे प्रतिनिधी घन:श्याम केळकर आज साताऱ्यात आले होते. त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ एम. एस. घुले, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर तसेच जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयातील अधिकारी यांची भेट घेतली. या सर्वांनीही यासाठी मदतीचे आश्वासन दिले आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी अॅकॅडमीच्या वेबसाईटवर नोंदणी करावी, असे आवाहन संबंधितांनी केले आहे.


