maharashtra

वनविभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा


A cage for leopards from the forest department
किरपे, ता. कराड येथे गुरुवारी सायंकाळी राज धनंजय देवकर या लहान चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर वनविभागाने आज शुक्रवारी त्याठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे.

कराड : किरपे, ता. कराड येथे गुरुवारी सायंकाळी राज धनंजय देवकर या लहान चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर वनविभागाने आज शुक्रवारी त्याठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे.
काल सायंकाळी ६-७ वाजण्याच्या दरम्यान बिबट्याने ५ वर्षाच्या मुलावर हल्ला करत त्याला ओढून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, याप्रसंगी मुलाच्या वडिलांनी प्रसंगावधान दाखवत प्रतिकार केल्यामुळे चिमुरडा बचावला होता. राज धनंजय देवकर (वय ५) असे बिबट्याने हल्ला केलेल्या मुलाचे नाव असून तो जखमी झाला होता. त्याच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सूरू आहेत.
दरम्यान, याच भागातील येणके ता. कराड गावात काही दिवसापूर्वी ऊसतोड मजुराच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यामध्ये त्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वनविभागाने पिंजरा लावत बिबट्याला जेरबंद केले होते. परंतु, किरपे येथे काल घडलेल्या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार कराड वनविभागाने तात्काळ आज त्या परिसराची पाहणी करीत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे.