maharashtra

1 कोटी 39 लाखांच्या फसवणूकीच्या गुन्ह्याचा तपास लवकर पूर्ण करण्यात यावा!

कांतीलाल अग्रवाल यांची मागणी; एचडीएफसी बँकेलाही सहआरोपी करणार

एचडीएफसी बँक कर्मचारी कौशिक भारत पाटील, मंदार कुलकर्णी, एजंट अमर मतकर या तिघांनी सुमारे 1 कोटी 39 लाखांची आर्थिक फसवणूक केली असून या फसवणुकीचा तपास लवकरात लवकर लागावा तसेच बँकेसही मी सहआरोपी करणार असल्याचे प्रतिपादन कांतीलाल सुरेश अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत केले.

सातारा : एचडीएफसी बँक कर्मचारी कौशिक भारत पाटील, मंदार कुलकर्णी, एजंट अमर मतकर या तिघांनी सुमारे 1 कोटी 39 लाखांची आर्थिक फसवणूक केली असून या फसवणुकीचा तपास लवकरात लवकर लागावा तसेच बँकेसही मी सहआरोपी करणार असल्याचे प्रतिपादन कांतीलाल सुरेश अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत केले.
याबाबत झालेल्या पत्रकार परिषदेत कांतीलाल अग्रवाल म्हणाले, दि. 2011 ते 23 सप्टेंबर 2022 दरम्यान कौशिक भारत पाटील सीनियर कम मॅनेजर, एसडीएफसी लाइफ इन्शुरन्स शाखा राधिका रोड, सातारा आणि मंदार कुलकर्णी हे दोघे मला भेटण्यासाठी माझ्या स्क्रॅपच्या दुकानावर आले. तेथे त्यांनी एचडीएफसीे लाइफ इन्शुरन्स पॉलिसी परिवारासाठी कशी चांगली आहे, याचे अमिष दाखवून पॉलिसी काढण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी मुलीच्या लग्नासाठी आणि व्यापाराकरीता स्वत:सह परिवारातील अन्य सदस्यांचीही पॉलिसी काढली. यानंतर मी विम्याची रक्कम 33 लाख रुपये भरली असता कौशिक भारत पाटील, मंदार कुलकर्णी, एजंट अमर मतकर या तिघांनी विमा भरल्याच्या पावत्या दिल्या. काही काळानंतर यातील कौशिक पाटील याने एचडीएफसी मधील माझी आणि परिवाराची पॉलिसी माझ्या अपरोक्ष सरेंडर केली. यातून आलेली रक्कम त्यांनी बँक ऑफ इंडिया या बँकेत फेक अकाऊंट काढून ती अग्रवाल यांच्या नावाने भरली. दरम्यान 11 वर्षे कांतीलाल अग्रवाल हे विश्‍वासाने या दुक्कलीला दरवर्षी विमा पॉलिसीच्या हप्त्याचे पैसे देतच होते. मात्र हे दोघे ते पैसे घेवून त्या पैशाचा विनियोग अन्य कारणांसाठी करीत होते.
23 सप्टेंबर रोजी पैशाची गरज असल्याने पॉलिसी सरेंडर करण्यासाठी कांतिलाल अग्रवाल हे एचडीएफसी बँकेत गेले असता त्यांची पॉलिसी तेथून पूर्वीच सरेंडर झाल्याचे सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कांतिलाल अग्रवाल यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे धाव घेत कौशिक भारत पाटील आणि मंदार कुलकर्णी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.
पत्रकार परिषदेत अग्रवाल यांनी आपला कायद्यावर विश्‍वास आहे. माझ्या फसवणुकीतील रक्कम मला परत मिळावी, या गुन्ह्याचा तपास लवकरात लवकर लागण्यात यावा तसेच एचडीएफसी बँकेलाही या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.