maharashtra

घरकुल योजनेसाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे साताऱ्यात आमरण उपोषण


नागठाणे येथील गट नंबर 702 या सरकारी जागेवरील 14 कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्याविषयी शासन निर्देश असतानाही अद्याप त्यांना घरकुले मिळाली नाहीत, याबाबतच्या मागणीसाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषण सुरू करण्यात आले.

सातारा : नागठाणे येथील गट नंबर 702 या सरकारी जागेवरील 14 कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्याविषयी शासन निर्देश असतानाही अद्याप त्यांना घरकुले मिळाली नाहीत, याबाबतच्या मागणीसाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषण सुरू करण्यात आले.
संघटनेचे प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब, पश्चिम आघाडी महाराष्ट्र सरचिटणीस राज रतन कांबळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुनीता ढेकळे, उपजिल्हाध्यक्ष सतीश वाघमारे, सचिव गुलाब बनसोडे, कार्याध्यक्ष अरुण पवार यांच्या मार्गदर्शनांतर्गत हे आंदोलन करण्यात आले.
किरण देवदास साठे, उज्वला अशोक मोहिते, शबाना शिकलगार, सुमन साळुंखे, भारतीय एकनाथ डोंगरे यांनी ठिया आंदोलन आणि आमरण उपोषण असा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. यावेळी जिल्हा प्रशासनाचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात नमूद आहे की, नागठाणे येथील गट नंबर 702 येथे 14 कुटुंबांना प्रति एक गुंठा याप्रमाणे जागा देण्यासंदर्भातील आदेश 2006 रोजी निर्देशित करण्यात आला होता. त्याची मोजणी प्रक्रिया सुद्धा पार पडली आहे. त्या ठिकाणी तेरा लाभार्थी कच्चे पत्र्याचे शेड टाकून राहत आहेत. ग्रामपंचायत ठराव तसेच सर्व कागदपत्रांची पूर्तता करून जिल्हा प्रशासनाने सदर ले-आउटला मान्यता दिली आहे. पंतप्रधान शासन निर्णयानुसार अतिक्रमण नियमित करून त्यांना ग्रामपंचायत नागठाणे यांच्याकडून नमुना आठ चे उतारे देण्यात आले आहेत.
ग्रामपंचायतीकडे सदर लाभार्थ्यांनी मागणी केली असता ग्रामसेवक, सरपंच उडवाउडवीचे उत्तर देतात. त्यामुळे सदर कुटुंबांना अद्याप नागठाणे येथे घरकुले मिळाले नाहीत. त्याकरता भीमशक्तीच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा देऊन हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. नागठाणे येथील हनुमंत मोहिते यांचे अतिक्रमण नियमित करावे व गटविकास अधिकारी ग्रामसेवक सरपंच यांची तातडीची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.