महाराष्ट्र राज्याचे चौथे महिला धोरण अंतिम टप्प्यात : ॲड. यशोमती ठाकूर
प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचरणी महिला धोरणाचा मसूदा अर्पण
प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्या चरणी महिला धोरणाचा मसूदा अर्पण करून महिला व बालविकास मंत्री अँड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, महाराष्ट्र राज्याचे चौथे महिला धोरण अंतिम टप्प्यात आहे.
सातारा : प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्या चरणी महिला धोरणाचा मसूदा अर्पण करून महिला व बालविकास मंत्री अँड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, महाराष्ट्र राज्याचे चौथे महिला धोरण अंतिम टप्प्यात आहे.
महिला धोरण आणणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे, मात्र आता महिला धोरणाची अंमलबजावणी करणारं पहिलं राज्य अशी ही महाराष्ट्राची ओळख नवीन धोरणामुळे होणार आहे. महिलांसोबत LGBYQIA+ ( इतर लिंगी समुदाय ) समुदायाचा आवर्जून या धोरणात समावेश करण्यात आलेला आहे. असा समावेश असलेले हे बहुधा देशातील पहिलेच धोरण आहे. महिला धोरण हे केवळ कागदावरच राहणार नाही, तर माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती त्यावर देखरेख करणार आहे. शिवाय महिला व बाल विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स ही स्थापन करण्यात येणार आहे. यामुळे या धोरणाच्या अंमलबजावणीवर काटेकोर लक्ष राहिल तसेच, या धोरणात आखून दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता ही युद्धपातळीवर होऊ शकेल. या धोरणामुळे जेंडर बजेटची संकल्पना ही अधिक प्रभावीपणे राबवता येईल, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
चौथ्या सुधारित महिला धोरणाच्या निर्मीतीत महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी, लोकप्रतिनिधींनी, तज्ज्ञांनी, संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला संघटनेने, युनिसेफ तसेच अनेक स्वयंसेवी संस्थांनी सक्रीय सहभाग घेतलेला असल्याचेही ॲड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
स्मार्ट अंगणवाडया आणि बोलक्या भिंतीबद्दल शाब्बासकीची थाप
कोरोनाकाळात अंगणवाडी सेविका, मदतनीस व विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘आपली अंगणवाडी, आपली जबाबदारी’ ओळखून अतिशय कौतुकास्पद काम केले आहे, असे सांगत स्मार्ट अंगणवाडया आणि बोलक्या भिंतीबद्दल राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सर्वांना शाब्बासकी दिली.
महाबळेश्वरमधील मेटगुताड येथील अंगणवाड्यांना भेटी दिल्या यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी (बाल कल्याण) रोहिणी ढवळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
राज्यात कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर असताना, अंगणवाडी सेविका, मदतनीस व विभागाच्या अधिकारी आपली सेवा देत होत्या. अंगणवाडया प्रत्यक्ष सुरू नसल्या तरी मात्र प्रसंगी ऑनलाइन पद्धतीने शिकवून बालकांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणात कोणताही खंड पडू दिला नाही. शिवाय विभागाच्या विविध उपक्रमात सक्रिय सहभाग घेत ते यशस्वीपणे पार पाडले. आज मेटगुताड येथील जीवनज्योत अंगणवाडी येथे ॲड. यशोमती ठाकूर यांनी भेट दिली.
यावेळी अंगणवाडी क्रमांक ३च्या स्थानिक भाज्या, फळे, धान्य आणि सकस आहाराचे महत्त्व उपक्रम, अंगणवाडी क्रमांक ६९ च्या आकार प्रशिक्षण उपक्रमांतर्गत साहित्य प्रदर्शन व बेबी केअर किट वितरण कार्यक्रम, तसेच अंगणवाडी क्रमांक ७०च्या पोषण अभियानांतर्गत समुदाय आधारित विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी विविध फळ- भाज्यांचे प्रदर्शन, स्थानिक लाभार्थींना वितरण, अन्न प्रशासन, सुपोषण दिवस असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
या स्तुत्य उपक्रमासह स्मार्ट अंगणवाडया, बोलक्या भिंती, जागे अभावी घराघरात फुललेल्या परसबागा याबाबत राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सर्वांचे कौतुक केले.
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलला भेट
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलला महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी भेट देवून शाळेची पहाणी केली. शाळेच्या सोयी-सुविधांसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी (बाल कल्याण) रोहिणी ढवळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झाले त्या शाळेत येण्याचे मला भाग्य लाभले. या शाळेने अनेक थोर व्यक्ती घडविल्या आहेत. ही शाळा ऐतिहासिक असून याचे जतन केले पाहिजे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिले आहे. या संविधानामुळे सर्वांना समान जगण्याचा हक्क दिला आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या शाळेत आल्यानंतर सकारात्मक ऊर्जा मिळाली आहे. राज्य शासन त्यांच्याच विचारांवर काम करीत असून शाळेच्या सोयी-सुविधांसाठी प्रयत्न करणार असल्याचेही महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे
कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांनी स्वत:ला एकटे समजु नये. संकटावर मात करा, आपले विचार चांगले ठेवा आणि पुढे जा. आपल्याला काही समस्या असतील तर त्या आम्हांला सांगा तुमच्या समस्या सोडविल्या जातील तुमच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये जिल्ह्यातील कोविड-19 मुळे मयत झालेल्या अंगणवाडी सेविकांच्या वारसांना सानुग्रह अनुदान धनादेशाचे व कोविड मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना अनाथ प्रमाणपत्राचे वाटप ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी जिल्हा कार्यक्रम अधिकारी (बाल कल्याण) रोहिणी ढवळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, संकट हे दणकट बनविते. आपण घाबरुन न जाता प्रत्येक आव्हानाचा सामना करावा. अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर या सर्व महिला आहेत. कोरोना संसर्गाच्या कालावधीत कोणीही घराबाहेर पडत नव्हेत त्यावेळी प्रत्येक घटकापर्यंत पोहचून त्यांनी काम केले आहे त्यांचे कौतुकही ॲड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी केले.
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज महिला काम करीत आहे. त्यांच्यासाठीच चौथे महिला धोरण आखण्यात आले असून त्याचे 8 मार्च 2022 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. या महिला धोरणाचा मसुदा अंतिम टप्प्यात असून या धोरणाची राज्यात प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध कमिट्यांचीही स्थापना करण्यात येणार असून प्रत्येक 6 महिन्याला या कमिट्यांमार्फत आढावा घेतला जाणार आहे. यामुळे महिला धोरण प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार आहे. मसुदा अर्पण झाल्यानंतर तो प्रत्येक महिलेने वाचावा, आपल्याला काय हक्क दिले आहेत त्याची माहिती करुन घ्यावी, असे आवाहनही महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी केले. या कार्यक्रमास अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होत्या.
सातारा जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष भक्कम करा
सातारा : सातारा जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करून जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष भक्कम करा, त्यासाठी लागेल ते सहकार्य करू असे आश्वासन महिला आणि बाळ मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले.
जिल्हा दौऱ्यावर आलेल्या ना. यशोमती ठाकूर यांनी आज काँग्रेस भवनला भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ सुरेशराव जाधव, अल्पना यादव,प्रदेश चिटणीस राजेंद्र शेलार जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, दत्तात्रय धनावडे, मनोजकुमार तपासे, रजनी पवार, धनश्री महाडीक, बाबासाहेब कदम, श्रीकांत चव्हाण, वैशाली जाधव, जसमीन खान, मबीश पाटील, रजिया शेख, मॉन्टी परळकर, मंजिरी पानसे, सुष्मराजे घोरपडे, नाजीम इनामदार, अमर करंजे, डॉ. पल्लवी साठे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
त्या पुढे म्हणाल्या, स्व. यशवंतराव चव्हाण यांची परंपरा लाभलेल्या कॉंग्रेस भवनात आज येण्याचे भाग्य लाभले आहे. सातारा जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्तेनि यशवंतराव चव्हाण यांचे विचार आणि धोरण जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी काम केले पाहीजे. काँग्रेस पक्ष्याने ज्यांना आमदार व विविध पदे देऊन मोठे केले, ती आपल्याला पडत्या काळात सोडून गेले. त्या गद्दाराना त्यांची जागा दाखवा. उद्याचे दिवस आपल्या काँग्रेसचे आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून न जाता जोमाने कामाला लागावे. मंत्री म्हणून सामाजिक कामाला जी मदत लागले, ती मदत करेन. पक्ष मोठा झाला तर तुम्ही आम्ही मोठे होऊ शकतो.


