ऑनलाइन रमी खेळण्यासाठी तब्बल 36 बॅटऱ्यांची चोरी
सातारा शहर पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या
ऑनलाईन रमी खेळण्यासाठी पैसे उपलब्ध व्हावेत याकरिता सातारा शहर औद्योगिक वसाहतीमध्ये तब्बल 36 बॅटऱ्यांची चोरी करणाऱ्या आरोपीस सातारा शहर पोलीस ठाण्याने ताब्यात घेतले आहे.
सातारा : ऑनलाईन रमी खेळण्यासाठी पैसे उपलब्ध व्हावेत याकरिता सातारा शहर औद्योगिक वसाहतीमध्ये तब्बल 36 बॅटऱ्यांची चोरी करणाऱ्या आरोपीस सातारा शहर पोलीस ठाण्याने ताब्यात घेतले आहे.
सुजित दिनकर झुंजार वय 27 राहणार कोपर्डे, तालुका कराड असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी, सातारा शहरातील एमआयडीसी महामार्गालगतच्या सर्व्हिस रोड, पेट्रोल पंप इत्यादी ठिकाणी पार्किंग केलेल्या वाहनांच्या बॅटरी चोरीचे प्रमाण वाढले होते. त्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्याने सातारा शहर पोलिसांनी रात्रगस्त आणि कसून पेट्रोलिंग चा धडाका लावला होता. सातारा शहरातून विविध ठिकाणी तसेच वळसे, भरतगाव, वाढे फाटा या ठिकाणी पोलिसांचे सातत्याने पेट्रोलिंग सुरू होते. या पेट्रोलिंग दरम्यान शहर पोलिसांना एक व्यक्ती संशयस्पदरीत्या वावरताना आढळून आली. तेव्हा त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने धक्कादायक कबुली दिली.
ऑनलाइन रमी खेळण्याची सवय लागल्याने आणि त्या खेळात पैसे लागत असल्याने बॅटरी चोरी करून त्याची विक्री करत असल्याचे त्याने सांगितले. त्याने 36 बॅटऱ्या चोरल्याचे कबूल केले असून त्याकडील चार लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ज्या वाहनधारकांच्या मागील दोन-तीन महिन्यापूर्वी बॅटऱ्या चोरी झाल्या आहेत त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी केले आहे.
या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अजय साबळे, विक्रम माने, विकास शिंदे, रोहित बाजारे, संतोष कचरे, सागर गायकवाड, गणेश घाडगे, विशाल धुमाळ, यांनी सहभाग घेतला होता. या कारवाईचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी कौतुक केले आहे.


