छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या सुशोभिकरणाचे काम सुरू करावे
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या रखडलेल्या सुशोभिकरणाचे काम लवकरात-लवकर सुरु करण्याची मागणी आज श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्यावतीने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व पोलिस अधीक्षक समिर शेख, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना निवेदनाद्वारे केली.
सातारा : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या रखडलेल्या सुशोभिकरणाचे काम लवकरात-लवकर सुरु करण्याची मागणी आज श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्यावतीने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व पोलिस अधीक्षक समिर शेख, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना निवेदनाद्वारे केली.
श्री शिवप्रतिष्ठानचे जिल्हा प्रमुख सतीश ओतारी, अमर बेंद्रे, विजय काटवटे, अजिंक्य गुजर, अभिजित बारटक्के, धनंजय खोले, शुभम शिंदे, महेश पवार, सोहम जोशी, अमित फाळके, आशुतोष खरे उपस्थित होते.
सातारा जिल्हा हा ऐतिहासिक व मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी असणार्या शिवछत्रपतींच्या स्मारकाचे सुशोभिकरणाचे काम रखडले आहे. हे काम ग्रेड सेपरेटरच्या कामाबरोबर चालू झाले. ग्रेड सेपरेटरचे काम पूर्णत्वास गेले. परंतु, पुरेशा निधीअभावी शिवतीर्थाच्या सुशोभिकरणाचे काम बंद पडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुशोभिकरणासाठी 8 कोटी निधी मंजुर केल्याने हे काम लवकरात लवकर सुरु करावे. तसेच 31 डिसेंबरला गड-किल्ल्यांवर काही अपप्रवृत्तीं कडून चुकीच्या घटना घडतात. त्यामुळे या अपप्रवृत्तींकडून हे प्रकार टाळण्यासाठी किल्ल्यांच्या मार्गावर व किल्ल्यांवर पोलिस बंदोबस्त ठेवावा. तरीदेखील गड-किल्यांवर चुकीचे प्रकार आढळल्यास त्यांना चोप देण्याचा ईशारा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने देण्यात आला.


