प्रतापगंज पेठेतील ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे पुलाला भगदाड
यंत्रणेची धावाधाव; भगदाड झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न
प्रतापगंज पेठ येथे भुयारी गटार योजनेचे काम सुरू असताना वीज वितरण कार्यालयासमोरील जुन्या पुलाला भगदाड पाडण्याचा उद्योग ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. हे पाप झाकण्यासाठी घाईघाईने त्यावर माती टाकून ते पत्र्याने बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला. मात्र नागरिकांनी याबाबतीत प्रशासनाचे लक्ष वेधून हे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला आहे.
सातारा : सातारा शहराची अंतर्गत सांडपाणी प्रकल्प व्यवस्था सध्या प्रगती पथावर आहे. प्रतापगंज पेठ येथे भुयारी गटार योजनेचे काम सुरू असताना वीज वितरण कार्यालयासमोरील जुन्या पुलाला भगदाड पाडण्याचा उद्योग ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. हे पाप झाकण्यासाठी घाईघाईने त्यावर माती टाकून ते पत्र्याने बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला. मात्र नागरिकांनी याबाबतीत प्रशासनाचे लक्ष वेधून हे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्या मोती चौक ते राधिका चौक या दरम्यान भुयारी गटार योजनेचे पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. या योजनेला तब्बल दोन वेळा प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. ही प्रस्तावित पाईपलाईन योजना करंजे गावाच्या दिशेने वळवण्यात येणार आहे. येथील प्रतापगंज पेठ परिसरात भुयारी गटार योजनेचे आज दुपारी काम सुरू असताना जुन्या ब्रिटिश कालीन पुलाला भगदाड पाडण्याचा प्रकार झाला. या पुलाखालून जुना वाहणारा ओढा त्यालगत असणारी चोरगे कमर्शियल कॉम्प्लेक्स ही इमारत त्याच्या पायालाच धोका निर्माण झाला आहे. पुलाला भगदाड पडताच काही नागरिकांनी ठेकेदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावून त्या प्रकाराची कल्पना दिली. या कामामुळे सध्या प्रतापगंज पेठ येथून जाणारा मार्ग सध्या बंद असून नागरिकांना लगतच्या छोट्या रस्त्याने कसरत करत मार्ग काढावा लागत आहे. काही ठिकाणी ठेकेदाराने रस्त्याचा समतलपणा घालवलेला आहे.
काही ठिकाणी मातीची प्रचंड भर टाकण्यात आल्याने हा रस्ता मूळ बांधकामापासून जवळपास पाच ते सव्वा पाच फूट उचलला गेला आहे. या साऱ्या तक्रारी झेलूनही तब्बल दहा दिवस हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचे ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. सततची धूळ आणि खनाखणी यामुळे प्रतापगंज पेठेच्या मार्केटमधील दुकानदार आणि हॉटेल व्यवसायिक वैतागले आहेत. त्यांच्या व्यवसायाला मार बसू लागल्यामुळे या भुयारी गटार योजनेच्या विरोधात तीव्र संतापाचे वातावरण आहे. काम जरुरी जरी असले तरी ते करताना लगतच्या दुकानदारांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी ठेकेदाराणे घेणे गरजेचे होते. ब्रेकरच्या माध्यमातून काही पुलांचे तर काही ओढ्यांची तटबंदी मोडून पडली आहे. आळूचा खड्डा येथे सुद्धा लगतचा मातीचा भराव खरडून काढण्यात आल्यामुळे सगळे ओढ्याचे पाणी तेथे साचू लागले आहे. या योजनेचा ठेकेदार राजकीय वरदहस्ताने समृद्ध असल्यामुळे काम करताना होणाऱ्या परिणामांची तमा न बाळगताच काम रेटून नेले जात आहे. त्याविषयी सुद्धा नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. कृपया भुयारी गटार योजनेचे काम ठेकेदाराने व्यवस्थित करून रस्ता सुस्थितीत आणून द्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.


