बनावट चेक देऊन वस्तू खरेदी करणारा भामटा विश्रुत भालचंद्र नवाथे, रा. शनिवार पेठ, सातारा याला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले.
सातारा : बनावट चेक देऊन वस्तू खरेदी करणारा भामटा विश्रुत भालचंद्र नवाथे, रा. शनिवार पेठ, सातारा याला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी, विश्रुत भालचंद्र नवाथे हा सांगली, पुणे, नवी मुंबई जिल्ह्यातील व्यवसायिकांना स्वतःच्या बँक खात्यावर रक्कम नसलेला चेक देऊन त्यांच्याकडून मोबाइल, लॅपटॉप, एलइडी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करून व्यवसायिकांची फसवणूक करीत असून तो सातारा येथील पोवई नाका परिसरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळाली. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या अधिपत्याखाली पथक तयार करून नवाथे याला जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने त्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद करून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सातारा शहर, वाई, कोरेगाव, फलटण, कोथरूड, नसरापुर, सासवड, विश्रामबाग, दादर येथील व्यवसायिकांची फसवणूक केल्याची कबुली दिली. त्याला पुढील तपासासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पथकाकडे सुपूर्त करण्यात आले आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, कांतीलाल नवघणे, विश्वनाथ संकपाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, संतोष सपकाळ, शरद बेबले, दिपाली यादव, अमोल माने, मुनीर मुल्ला, शिवाजी भिसे, प्रवीण पवार, पृथ्वीराज जाधव, प्रीती पोतेकर यांनी सहभाग घेतला. या कारवाईत सहभागी झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षक अजय बंसल यांनी अभिनंदन केले.


