maharashtra

विरोधकांनी सत्तेचे स्वप्न बघणं सोडून द्यावं!

खासदार उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला

केंद्र व राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीच्या सरकारने लोककल्याणाची कामे बारकाईने केली. लोक कामाकडे बघून  मते देतात. निष्क्रिय विरोधकांना मते मागण्याचा अधिकारच राहिला नसून त्यांनी सत्तेचे स्वप्न सोडून द्यावं, असा सल्ला महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला.

पाटण : केंद्र व राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीच्या सरकारने लोककल्याणाची कामे बारकाईने केली. लोक कामाकडे बघून  मते देतात. निष्क्रिय विरोधकांना मते मागण्याचा अधिकारच राहिला नसून त्यांनी सत्तेचे स्वप्न सोडून द्यावं, असा सल्ला महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला.
मेंढोशी ता. पाटण येथे मणदुरे विभागातील  कार्यकर्त्यांच्या संवाद मिळाव्यात हे बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,ग्रामपंचायत सदस्य धनश्री जाधव, दत्तात्रय जाधव, आनंदा मराठे, राजाराम पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, सुरेश जाधव, दादासाहेब जाधव, मारुती पाटील, गोविंद जाधव उपस्थित होते.
पाटण विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून कोट्यवधीची कामे झाली आहेत. त्यांच्या नेतृत्वाच्या प्रभावामुळे पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील त्यांची सत्ता आलेली आहे. नको त्या लोकांकडून आता अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. आगामी काळामध्ये शंभुराज देसाई यांच्याशी सल्ला मसलत करून पाटण तालुक्यात विकासकामांसाठी केंद्राकडून मोठ्या प्रमाणावर निधी आणला जाणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे चुकून दोन आमदार निवडून आले. आता मात्र आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये वेगळे चित्र पाहायला मिळेल. लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार निवडून येतील आणि सातारा जिल्हा महायुतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाईल, असेही उदयनराजे म्हणाले.
शंभूराज देसाई म्हणाले, तारळी धरण पाटण तालुक्यात असून हे सर्व पाणी सांगलीला जात होते. प्रकल्पाला सुधारित मान्यता आणल्यामुळे 525 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे पाटण परिसरातील दोन हजार एकर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. चिटेकर योजना बारमाही करण्याचा निर्णय घेतला असून आगामी काळात तारळी पॅटर्न राबवण्याचा निर्धार करण्यात आला आहे असे प्रतिपादन ना.देसाई यांनी केले.