maharashtra

मानवी समस्यांना भिडण्याची ताकद ग्रंथांमध्ये

बाविसाव्या सातारा ग्रंथ महोत्सवाचे साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन

माणसाच्या जगण्यातल्या दैनंदिन समस्या केवळ ग्रंथ व्यासंगाच्या जोरावर सोडवल्या जाऊ शकतात, असे कळकळीचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व 84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केले.

सातारा : ग्रंथ म्हणजे केवळ पुस्तकाच्या पानांवरची अक्षरांची गर्दी नाही. ग्रंथ माणसाला जगायला शिकवतात. भ्याड राजकीय व्यवस्था ग्रंथ व्यासंगाला घाबरते. ती तुमच्या श्रद्धांवर बोलते, पण तुमचे प्रश्न सोडवू शकत नाही. माणसाच्या जगण्यातल्या दैनंदिन समस्या केवळ ग्रंथ व्यासंगाच्या जोरावर सोडवल्या जाऊ शकतात, असे कळकळीचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व 84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या मैदानावर शंकर सारडा नगरीमध्ये शुक्रवारी 22 व्या ग्रंथ महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, ग्रंथ महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर यशवंत पाटणे, कार्यवाह शिरीष चिटणीस, कोषाध्यक्ष साहेबराव होळ, उपाध्यक्ष विनायक लांडगे, समन्वय समितीचे सदस्य डॉक्टर राजेंद्र माने, सुनीता कदम इत्यादी यावेळी उपस्थित होते.
उत्तम कांबळे पुढे म्हणाले, सातारा ग्रंथ महोत्सव हा गेल्या दोन दशकांमध्ये महिलाचा दगड ठरला असून तो महाराष्ट्रातल्या सर्व ग्रंथ महोत्सवांना दिशादर्शक आहे. ग्रंथ म्हणजे केवळ पानांवर पुस्तकांची गर्दी नाही, तर ग्रंथाच्या व्यासंगातून जगण्याचे सत्व आणि तत्व याला आकार मिळतो. ग्रंथ माणसाला जगायला शिकवतात. नात्यांचा आणि भावभावनांचा विस्तार ग्रंथातून होतो. जो माणूस निसर्ग संस्कृतीत रमत होता तो माणूस ग्रंथ व्यासंगाने पारंपारिक संस्कृती तयार करून त्यामध्ये जगायला शिकला. जी राजकीय व्यवस्था मानवी समस्या सोडून धार्मिक भावना आणि श्रद्धांजली असते, मेंदू आणि मनगट कामाला लावू शकत नाही त्यामुळेच आजकाल महापुरुषांच्या भांडणाचा विषय हा कळीचा मुद्दा आहे. मानवी समस्या आणि त्यांना भेटण्याची ताकद आणि वैचारिकता ही पुस्तकांच्या व्यसना मधूनच येते. ग्रंथांमध्ये आणि शब्दांमध्ये जगण्या मरण्याचे भाव असतात. म्हणून ग्रंथ हा जगण्याचा आणि सर्व भावनांचा खजिना आहे. मानवी संवेदना आणि दुःख टिपण्याचे काम साहित्यच करते म्हणून नेहमी कोणताही ग्रंथ हा परिपूर्णतेने वाचला गेला पाहिजे, असा आग्रह उत्तम कांबळे यांनी धरला. ज्ञानेश्वर खिलारी म्हणाले, सोशल मीडियामुळे अर्धवट ज्ञानाचा धोका वाढला आहे. जगण्याचे आणि संघर्षाचे दिवस मागे पडून जागतिकीकरणामुळे नवी व्यवस्था उदयाला येत असून येथील मानवी प्रश्न हे मूलभूत जगण्याची निगडित नाहीत. ग्रंथसंपदा आपल्या मूळ परंपरा आणि जगण्याचे भान देते. त्यासाठी पुस्तके वाचली गेली पाहिजेत. ग्रंथ महोत्सव समितीने दोन दशकापूर्वी जो ज्ञान सत्संगाचा वसा घेतला आहे तो त्यांनी कायम ठेवला असून त्यातूनच उद्याचे साहित्य घडणार असल्याचे खिलारी यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. सातारा जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. सातारा ग्रंथ महोत्सव समितीने प्रकाशित केलेल्या ग्रंथ समीक्षा या पुस्तिकेचेसुद्धा यावेळी प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरीष चिटणीस यांनी केले. अध्यक्ष प्राचार्य यशवंत पाटणे यांनी ग्रंथ महोत्सवांच्या मागील वीस वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेत पुढील चार दिवसाच्या वाटचालीला वाचकांच्या गर्दीमुळेच बळ मिळणार आहे आणि उत्तम उत्तम पुस्तकांचा रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन केले.
सुनिता कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ग्रंथ महोत्सव संयोजन समितीच्या वतीने उत्तम कांबळे आणि ज्ञानेश्वर खिलारी यांचा शाल, श्रीफळ  देऊन सन्मान करण्यात आला
वाचन संस्कृतीच्या जागराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समिती आणि सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित ग्रंथ महोत्सवाची दोन वर्षाच्या कालखंडानंतर पुन्हा पारंपारिक सुरुवात झाली. वाचन संस्कृतीच्या जागर करणाऱ्या सातारा ग्रंथ महोत्सवाच्या ग्रंथ दिंडीला शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गांधी मैदान राजवाडा ते जिल्हा परिषद मैदानावरील शंकर सारडा नगरी यादरम्यान निघालेल्या ग्रंथदिंडीत लिहिते व्हा साक्षर व्हा वाचन संस्कृतीचा आदर करा, असे सांगणाऱ्या अनेक लक्षवेधी कलाविष्काराने ग्रंथदिंडीला चार चाँद लावले.
या दिंडीमध्ये सातारा शहरातील शेकडो शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर भरलेल्या ग्रंथ महोत्सवाच्या उद्घाटन निमित्ताने सकाळी साडेआठ वाजता ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या ग्रंथ दिंडीचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, ग्रंथ महोत्सव समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे, कार्यवाह शिरीष चिटणीस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, उपाध्यक्ष विना लांडगे, समन्वयक प्रल्हाद पार्टी समिती सदस्य डॉक्टर राजेंद्र माने, सुनीता कदम, प्रमोदिनी मंडपे यांच्या उपस्थितीत ग्रंथ महोत्सवाच्या दिंडी पुढे श्रीफळ वाढवून दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा व ग्रंथ दिंडीचे पूजनं करण्यात आले.
राजवाडा येथील गांधी मैदानापासून ग्रंथ दिंडीला प्रारंभ झाला. ही दिंडी मोती चौक, शाहू चौक, राजपथ, पोवई नाका मार्गे जिल्हा परिषदेच्या मैदानावर पोचली. यामध्ये बहुतांश शाळांनी जनजागृती करणारे चित्ररथ सादर केले होते. महाराष्ट्राच्या परंपरा, संस्कृती व ग्रंथ व्यासंग यांचे प्रतिबिंब या ग्रंथदिंडीत पहायला मिळाले. यामध्ये महोत्सव समितीचे पदाधिकारी व साहित्यिक सहभागी झाले. उत्तम कांबळे व महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रंथदिंडीला खांदा देऊन ग्रंथ महोत्सवाची शानदार सुरुवात केली.