कौटुंबिक वादातून नातवाने वयस्कर आजीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना फलटण येथे घडली आहे. या घटनेमुळे फलटण शहरात खळबळ उडाली आहे.
सातारा : कौटुंबिक वादातून नातवाने वयस्कर आजीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना फलटण येथे घडली आहे. या घटनेमुळे फलटण शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मंगल बबन शिंदे (अंदाजे वय 65, रा. ठाकुरकी, ता. फलटण) या सायंकाळी फलटण येथील विमानतळाच्या जागेत त्यांच्याकडील शेळ्या चारण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांचा नातू आकाश सुखदेव शिंदे (वय 25, रा. फलटण) हा सायंकाळी 5:20 वाजण्याच्या सुमारास याठिकाणी आला असता मंगल बबन शिंदे शेळ्या चारत होत्या. यावेळी संशयित आरोपी आकाश शिंदे याचा त्याची आजी मंगल शिंदे यांच्याशी कौटुंबिक वाद झाला. वादाचे रूपांतर मारामारीत झाले असता संशयित आरोपी आकाश शिंदे याने त्याठिकाणी पडलेला मोठा दगड आजी मंगल शिंदे यांच्या डोक्यात मारला. यावेळी आजी मंगल शिंदे या जमिनीवर रक्तबंबाळ होऊन पडल्या. शेजारीच सैन्य भरती प्रशिक्षण करीता आलेल्या युवकांनी व फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता संशयित आरोपी आकाश हा घडनास्थळाहून पळू लागला. नागरिकांनी त्याचा पाठलाग केला असता संशयित आरोपी आकाश हा शहर पोलीस ठाण्यात हजर झाला.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी घटनस्थळाला भेट देऊन पुढील तपासाच्या सूचना दिल्या. रात्री उशिरा पर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते. फलटण शहरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.


