maharashtra

अजिंक्यतारा किल्ल्यावरून पडलेल्या व्यक्तीला जीवदान


सातारा शहर परिसरात असणाऱ्या अजिंक्यतारा किल्ल्यावरील कड्यावरून पडलेल्या व्यक्तीला जीवदान देण्यात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीम आणि पोलिसांना यश मिळाले. हणमंत जाधव असे त्यांचे नाव असून ते १४ पेक्षा अधिक तास दरीत अडकून पडले होते.

सातारा : सातारा शहर परिसरात असणाऱ्या अजिंक्यतारा किल्ल्यावरील कड्यावरून पडलेल्या व्यक्तीला जीवदान देण्यात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीम आणि पोलिसांना यश मिळाले. हणमंत जाधव असे त्यांचे नाव असून ते १४ पेक्षा अधिक तास दरीत अडकून पडले होते.
याबाबत मिळालेली माहिती अशी, दौंड, जि. पुणे येथील हणमंत जाधव, वय ६४  हे  सातारा येथे आले होते. त्यानंतर ते काल शुक्रवारी सायंकाळी सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्यावर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांचा पाय घसरून ते किल्ल्यावरील कड्यावरून थेट दरीत कोसळले. संध्याकाळची वेळ असल्यामुळे ही घटना कोणाच्याही लक्षात आली नाही. रात्रभर तब्बल १४ पेक्षा अधिक तास ते त्याच ठिकाणी पडून होते. आज सकाळी शनिवारी अजिंक्यतारा किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या काही लोकांच्या निदर्शनास ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी पोलिसांची संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मदत कार्य हाती घेतले मात्र पावसाचा शिडकावा आणि धुक्याचे वातावरण यामुळे मुदत कार्यात अडथळा येत असल्यामुळे त्यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीमला पाचरण केले. टीम आणि पोलिसांच्या मदतीने जाधव यांना कड्यातील दरीतून बाहेर काढण्यात यश आले. त्यांच्यावर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.