श्रध्दा किंवा अंधश्रध्दा तपासताना चिकित्सा करायला हवी. शब्दप्रामाण्य नाकारून बुध्दिच्या, तर्कशास्त्राच्या आधारावर समाजमनात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. ही जबाबदारी आपण जर प्रामाणिकपणे पार पाडली आणि विज्ञाननिष्ठ समाज घडवला तर अंधश्रध्दांचे उच्चाटन करता येऊ शकेल, असा विश्वास अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी व्यक्त केला.
सातारा : श्रध्दा किंवा अंधश्रध्दा तपासताना चिकित्सा करायला हवी. शब्दप्रामाण्य नाकारून बुध्दिच्या, तर्कशास्त्राच्या आधारावर समाजमनात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. ही जबाबदारी आपण जर प्रामाणिकपणे पार पाडली आणि विज्ञाननिष्ठ समाज घडवला तर अंधश्रध्दांचे उच्चाटन करता येऊ शकेल, असा विश्वास अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी व्यक्त केला.
जनता शिक्षण संस्थेचे किसनवीर महाविद्यालय वाई, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती, शाखा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दोन दिवसीय राष्ट्रीय विज्ञान परिषदेचा समारोप आज झाला. या कार्यक्रमात प्रा. श्याम मानव बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. विलास खंडाईत, प्रा. डॉ. एस. पी. कांबळे, प्रा. डॉ. विनोद वीर आदी मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते. या समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सामाजिक न्याय विभागाचे सहआयुक्त नितीन उबाळे यांनी भूषविले.
या समारोप कार्यक्रमापूर्वी प्रा. श्याम मानव यांची प्रकट मुलाखत सचिन प्रभूणे व साहित्यिक अरुण जावळे यांनी घेतली. या मुलाखती दरम्यान प्रा. श्याम मानव यांनी आपल्या खास शैलीत विवेचन केले. अंधश्रध्दा निर्मूलनाच्या चळवळीचा प्रवास स्पष्ट केला. धर्माधर्मामध्ये पुरोहितशाही असून शब्दप्रामाण्य हे अंधश्रध्देचे मूळ आहे. आपली लढाई शब्दप्रामाण्याविरुध्द आहे. धर्माच्या आणि देवाच्या विरोधात ही चळवळ नाही तर त्याच्या आधाराने जे शोषण होत आहे त्याविरोधात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदन भोसले उपस्थित होते.
डॉ. भारत पाटणकर यांनी 'भारतीय संस्कृती आणि अंधश्रध्दांची उत्पत्ती' या विषयावर मार्गदर्शन केले. धर्म व संस्कृती या भिन्न गोष्टी आहेत. अंधश्रध्दा धर्मामुळे, अज्ञानामुळे, दुःखामुळे, भीतीमुळे निर्माण होते. अंधश्रध्दा नष्ट करण्यासाठी ज्ञान वाढविणे,अंधश्रध्दा उघडी पाडणे जसे गरजेचे आहे, तसेच अंधश्रध्दा निर्मितीच्या उगमस्थानांवरही प्रहार करणं गरजेचे असल्याचे डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले.
समारोप सोहळ्यात विज्ञान प्रदर्शनातील विजेते प्रद्युम्न मोटे, गितांजली जगदाळे, वेंदात जगदाळे, साहिल जाधव, आदित्य जाधव यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह तसेच सन्मानपत्र प्रा. श्याम मानव यांच्या हस्ते देण्यात आले. उत्तेजनार्थ प्रज्योत वायकर, मंदार सोनावणे या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. ही दोन दिवसीय राष्ट्रीय विज्ञान परिषद यशस्वी कराण्यासाठी उपप्राचार्य डॉ. सुनील सावंत, डॉ. डी. एन. झांबरे, डॉ. विनोद वीर, डॉ. भानुदास आगेडकर, प्रा. प्रमिला सरगडे, प्रा.अर्जून जाधव, अनंता वाघमारे, प्रा. सुशांत स्वामी, प्रा. हरिष कारंडे, प्रा. उमेश खोले, सुनील खरात आदींनी विशेष परिश्रम घेतले. या परिषदेसाठी विविध महाविद्यायातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक, प्राध्यापिका तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.


