एसटी स्टँड परिसरात एकावर जिवघेणा हल्ला
तलवारीसारख्या धारदार शस्त्राने वार; संशयितावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा
सातारा शहरातील एसटी स्टॅन्ड परिसरातील कॉंग्रेस भवनासमोर पानपटपरीवर सिगारेट ओढताना संशयित आरोपी मनोज घाडगे याने एकावर तलवारीसारख्या धारदार शस्त्राने वार केला. गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून संशयितावर शहर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : सातारा शहरातील एसटी स्टॅन्ड परिसरातील कॉंग्रेस भवनासमोर पानपटपरीवर सिगारेट ओढताना संशयित आरोपी मनोज घाडगे याने एकावर तलवारीसारख्या धारदार शस्त्राने वार केला. गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून संशयितावर शहर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
संदीप आनंद मेळाट (वय 31, रा.दिव्यनगरी, शाहूपुरी, सातारा) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार संदीप मेळाट हे रात्री 9.30 वाजता दुचाकीवरुन कॉंग्रेस भवनासमोर सिगारेट ओढण्यासाठी गेले होते. त्यावेळी मनोज घाडगे याची एका युवकासोबत वादावादी सुरु होती. यावेळी तक्रारदार यांनी पानपट्टीतून सिगारेट घेतल्यानंतर तेथेच ते ओढत थांबले होते. काही वेळानंतर मनोज घाडगे व संबंधित युवकांचा वाद मिटला. यानंतर मात्र मनोज घाडगे तक्रारदार यांच्याकडे आला व त्याने थेट तक्रारदार यांच्यावर वार केला. तू इथून निघून जा, नाहीतर तलावर पोटात खुपशीन,’ अशी मनोज घाडगे याने दमदाटीही केली. या हल्ल्यात तक्रारदार डाव्या कानावर व डोक्याला दुखापत झाली आहे. या सर्व घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
जखमी अवस्थेत तक्रारदार नगरसेवक सुनील काळेकर यांच्याकडे गेला व त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती दिली. दोघांनी शहर पोलिस ठाणे गाठले व घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी जखमीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले व रुग्णालयात जाबजबाब घेतले. जाबजबाबानंतर पोलिसांनी मनोज घाडगे याच्याविरुध्द हाफ मर्डरचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, ज्या युवकासोबत घाडगे याचा वाद झाला होता तो तक्रारदार मेळाट यांचा साथीदार असावा, याचा गृह करुन वार केला असल्याची शक्यता तक्रारदार यांनी पोलिसांकडे वर्तवली आहे.
दरम्यान, एसटी स्टॅन्ड परिसरात तलवार हल्ला झाल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्र झाल्यानंतर हा परिसर सुरक्षित नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. यामुळे पोलिसांची गस्त परिसरात वाढवण्याची मागणी होत आहे.


