maharashtra

घाडगे हॉस्पिटल प्रकरणाची नि:ष्पक्षपणे चौकशी व्हावी

सोमनाथ पवार यांची पत्रकार परिषदेत मागणी, योग्य चार्जशीट दाखल होण्याची व्यक्त केली अपेक्षा

नागठाणे येथील घाडगे हॉस्पिटलमध्ये हलगर्जीपणातून एका नवजात अर्भकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी डॉक्टर दांपत्यासह दोघांवर नागठाणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली.

सातारा : नागठाणे येथील घाडगे हॉस्पिटलमध्ये हलगर्जीपणातून एका नवजात अर्भकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी डॉक्टर दांपत्यासह दोघांवर नागठाणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणाची नि:ष्पक्ष चौकशी व्हावी व चार्जशीट दाखल होताना ते पुरेशा कागदपत्रांसह व योग्य पुराव्यांसह दाखल व्हावे, अशी मागणी मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सोमनाथ पवार यांनी केली आहे.
येथील शासकीय विश्रामगृहात पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, प्रसारमाध्यमे आणि सामूहिक प्रयत्न यामुळे नीलम सोमनाथ बेंद्रे यांना जागतिक महिला दिनी या प्रकरणी न्याय मिळाला आहे. मात्र नागठाणे पोलिसांनी या प्रकरणाचे चार्जशीट न्यायालयात दाखल करताना योग्य पुरावे आणि कागदपत्रांसह ते दाखल करावे व हे प्रकरण तडीस न्यावे. या प्रकरणांमध्ये विकास तुकाराम घाडगे, मेघा विकास घाडगे, निलेश सुभाष घाडगे व कोमल गायकवाड या चौघांना अटक करण्यात आली होती. पैकी दोघांना पोलीस कोठडी देण्यात आली असून दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी पोलीस अधीक्षक समीर शेख यांना फोन करून हे प्रकरण तत्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. त्याच्यानंतरच नागठाणे पोलिसांनी त्वरित हालचाली करून चौघांना अटक केली. या प्रकरणातील पीडित महिलेला आणि त्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ न्याय देणे गरजेचे आहे. न्यायालयात हे प्रकरण दाखल होताना योग्य पुराव्यानिशी दाखल झाले तर त्या खटल्याला अधिक बळकटी येणार आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी जातीने लक्ष घालून संबंधित तपास यंत्रणांना सूचना द्याव्यात, अशीही मागणी पवार यांनी केली आहे.