शाहूनगरमध्ये वृध्द महिलेची फसवणूक
अनोळखी दोघांनी हातचलाखीने 5 तोळे सोन्याचा ऐवज नेला चोरुन
सातारा शहरातील किल्ले अजिंक्यतारा पायथ्याशी असलेल्या नलवडे कॉलनी, शाहूनगरमध्ये वृध्द महिलेला अनोळखी दोघांनी फसवणूक करत हातचलाखीने 5 तोळे सोन्याचा ऐवज चोरुन नेला. या घटनेने ज्येष्ठ नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : सातारा शहरातील किल्ले अजिंक्यतारा पायथ्याशी असलेल्या नलवडे कॉलनी, शाहूनगरमध्ये वृध्द महिलेला अनोळखी दोघांनी फसवणूक करत हातचलाखीने 5 तोळे सोन्याचा ऐवज चोरुन नेला. या घटनेने ज्येष्ठ नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सौ.कमल रामराव शिंदे (वय 76, रा.शाहूनगर, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दि. 10 रोजी सांयकाळी 6 वाजता नलवडे कॉलनी, शाहूनगर येथे घडली आहे. तक्रारदार वृध्दा फिरायला जात असताना त्याठिकाणी दोन अनोळखी युवक आले. ‘पुढे बिलबिले साहेबांचा बंदोबस्त लागला आहे. अंगावर एवढे सोने घालून फिरु नका. ते तुम्हाला पुडीत बांधून देतो. तुम्ही तोंडाला मास्क लावा,’ असे सांगून अनोळखी युवकांनी हातचलाखीने वृध्द महिलेच्या सोन्याच्या बांगड्या न देता पुडीमध्ये बेंटेक्सच्या 3 बांगड्या ठेवून पोबारा केला. घाबरलेल्या महिलेने पुडीमध्ये पाहणी केली असता तिची फसवणूक झाल्याचे समोर आले.
या घटनेनंतर वृध्द महिलेने पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली. संशयित युवक दुचाकीवरुन आले होते. महिलेने पोलिसांना वर्णन दिले असून पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, ‘पोलिस पुढे असल्याचे सांगून’ फसवणारी टोळी पुन्हा सक्रीय झाल्याने महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिवसा व रात्री गस्त वाढवण्याची गरज निर्माण झाली असून कोणीही दागिने मागितल्यास त्यांना न देता तात्काळ मदत मागून पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


