maharashtra

सालपे येथे एकाचा किरकोळ कारणातून लाकडी दांडक्याने खून

दोघे भाऊ फरार; लोणंद पोलीसांची पथके विविध ठिकाणी रवाना..!

Murder of a man with a wooden stick for petty reasons at Salpe
सातारा जिल्ह्यातील सालपे ता. फलटण येथील एसटी थांब्याजवळ किरकोळ कारणावरुन एकाचा लाकडी दांडक्याने दोघा भावांनी बेदम मारहाण करुन शेतमजूराचा खून केल्याने लोणंद परिसरात खळबळ उडाली आहे. यामध्ये लाकडी दांडक्याने मारहाण करीत खून करणारे संशयित दोघे भाऊ घटनास्थळावरुन फरार झाले असून शोधकार्यासाठी लोणंद पोलीसांचे विविध ठिकाणी पथके रवाना झाली आहे.

फलटण : सातारा जिल्ह्यातील सालपे ता. फलटण येथील एसटी थांब्याजवळ किरकोळ कारणावरुन एकाचा लाकडी दांडक्याने दोघा भावांनी बेदम मारहाण करुन शेतमजूराचा खून केल्याने लोणंद परिसरात खळबळ उडाली आहे. यामध्ये लाकडी दांडक्याने मारहाण करीत खून करणारे संशयित दोघे भाऊ घटनास्थळावरुन फरार झाले असून शोधकार्यासाठी लोणंद पोलीसांचे विविध ठिकाणी पथके रवाना झाली आहे. यामध्ये बापू संभाजी निकम (वय 38,रा.शेरेचीवाडी(हिं)) असे खून झालेल्या शेतमजूराचे नाव आहे.
याबाबतची लोणंद पोलीस व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, लोणंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत सालपे गावाच्या हद्दीमधील एस.टी.बसथांब्याजवळ बापू निकम हे काही कामानिमित्त थांबले होते. दरम्यान, त्याठिकाणी किरकोळ कारणावरुन बापू निकम यांचे व सौरभ संजय जगताप, गौरव संजय जगताप (दोघे रा. सालपे ता.फलटण) या भावांबरोबर वादावादी झाली. सौरभ जगताप, गौरव जगताप यांनी बापू निकम यांना रागातून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यामध्ये बापू निकम यांच्या वर्मी घाव लागल्याने गंभीर जखमी होत ते जागीच ठार झाले. यावेळी घटनास्थळावरुन सौरभ जगताप व गौरव जगताप या बंधूंनी पलायन केले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणंद पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. यादरम्यान, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी व लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस अंमलदार महेश संपकाळ, लोणंद पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
यावेळी मृत बापू निकम यांचा मृतदेह शवविच्छेदन लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करीत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनला झाली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर करीत आहेत.