maharashtra

बांधकाम विभागाने वर्णे येथील निकृष्ट रस्त्याची खोटी कागदपत्रे सादर केली

रमेश उबाळे यांचा आरोप; अन्यथा दि.25 पासून पुन्हा आमरण उपोषण

The construction department submitted false documents of inferior road at Varne
वर्णे, ता. सातारा येथे स्थानिक विकास निधीतून झालेला रस्ता निकृष्ट असताना बांधकाम विभागाने या रस्त्याची खोटी कागदपत्रे सादर करून दि.25 मार्च रोजी केलेले उपोषण मोडण्याचा प्रयत्न केला असून बांधकाम विभागाचे अभियंता, उप अभियंता व कर्मचार्‍यांना निलंबित करून त्यांचेवर गुन्हा दाखल करावा

पुसेगाव : वर्णे, ता. सातारा येथे स्थानिक विकास निधीतून झालेला रस्ता निकृष्ट असताना बांधकाम विभागाने या रस्त्याची खोटी कागदपत्रे सादर करून दि.25 मार्च रोजी केलेले उपोषण मोडण्याचा प्रयत्न केला असून बांधकाम विभागाचे अभियंता, उप अभियंता व कर्मचार्‍यांना निलंबित करून त्यांचेवर गुन्हा दाखल करावा अन्यथा आपण दि.25.4.2022 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभागाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी दिला आहे. याबाबत आता त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, वर्णे ता.सातारा येथील कॉंक्रिटचा पूर्ण रस्ता उखडला आहे. या रस्त्याचे काम टेंडरमध्ये दिलेल्या निकषाप्रमाणे झाले नाही. सदर कॉंक्रिट रस्ता खोर्‍याने ओढला असता वाळू खडी मिश्रीत माल पाटीमध्ये भरला जातो. एम 20 ग्रेड चे कॉंक्रिटिकरण फक्त कागदोपत्री दाखविण्यात आले आहे. सद्यस्थितीत रस्ता पूर्ण उखडून पडला असून कॉंक्रिटची जाडी कमी असल्याने असे घडले आहे. म्हणून कॉंक्रिटचे कोअर कटिंग करून प्रत्यक्ष वर्णे गावात झालेल्या रस्त्याची जाडी मोजावी. उखडलेल्या रस्त्याची पाहणी वर्णे गावात जाऊन संबंधित अधिकार्‍यांनी करावी.पाटी खोर्‍याने कॉंक्रिटच्या रस्त्याचा माल भरला जातो याबाबतचा व्हिडीओ मुख्यमंत्र्यांना पाठवावा. संबंधीत मजूर संस्थेस ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे. संबंधीत बांधकाम विभागातील अभियंता, उप अभियंता व कर्मचार्‍यांना त्वरित निलंबित करून त्यांचेसहीत ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा. अशी आपली मागणी आहे.
या मागण्या मान्य न केल्यास आपण दि.25 एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे रमेश उबाळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
अधिकार्‍यांपासून माझ्या जीविताला धोका
वर्णे गावात झालेल्या रस्त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. दडवा-दडवी करून हा भ्रष्टाचार झाकण्याचा संबंधित अधिकार्‍यांचा प्रयत्न आहे. खोटी कागदपत्रे सादर करणारे हे अधिकारी आपली नोकरी वाचविण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात संबंधित अधिकार्‍यां पासून माझ्या जीविताला धोका असून माझ्या जीवाचे काही बरे वाईट झालेस या बांधकाम अभियंता, उप अभियंत्यांना जबाबदार धरण्यात यावे याबाबत आपण मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री यांचेशी पत्रव्यवहार केल्याचेही रमेश उबाळे यावेळी म्हणाले.
जनतेसाठी आता जिवाची पर्वा नाही
सर्वसमान्य जनतेकडून करवसुली करून शासन सार्वजनिक कामांसाठी विकास निधी देत असते रस्ता तयार झाल्यानंतर किमान 5 वर्षे तरी रस्ता टिकला पाहिजे आज रस्ता झाला आणि उद्या उखडला जनतेच्या पैशाचा अपव्यय होत असेल तर आता हे चालणार नाही सामान्य जनतेसाठी माझां प्राण गेला तरी चालेल मला आता जीवाची पर्वा नाही. कोरोनातुन मला जीवदान मिळाले आहे हे मिळालेले जीवन जनतेच्या उपयोगी यावे हीच आपले इच्छा आहे त्यामुळे मला आता माझ्या जिवाची पर्वा राहिली नाही तुम्हाला वाटत असल्यास माझा जीव घ्या परंतु न्याय द्या, अशी माझी भूमिका असल्याचे असेही रमेश उबाळे आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले.