रिक्षा चालकांच्या मुलींना मिळाले मुदत ठेवीचे संरक्षण
मंगळवार तळे परिसरात माजी नगरसेवक वसंत लेवे यांचा पुढाकार
मंगळवार तळे परिसरातील अष्टविनायक रिक्षा स्टँन्डवरील रिक्षा चालकांना माजी नगरसेवक वसंत लेवे यांनी वेगळी भेट दिली आहे. लेवे यांच्या पुढाकाराने रिक्षा चालकांच्या मुलींच्या नावे दहा हजार रुपयांची मुदत ठेव पावती करण्यात आली आहे.
सातारा : मंगळवार तळे परिसरातील अष्टविनायक रिक्षा स्टँन्डवरील रिक्षा चालकांना माजी नगरसेवक वसंत लेवे यांनी वेगळी भेट दिली आहे. लेवे यांच्या पुढाकाराने रिक्षा चालकांच्या मुलींच्या नावे दहा हजार रुपयांची मुदत ठेव पावती करण्यात आली आहे. या अनोख्या उपक्रमाचे तळे परिसरामध्ये कौतुक होत असून मंगळवार तळे रिक्षाचालक संघटनेच्या वतीने लेवे यांना धन्यवाद देण्यात आले आहेत.
मंगळवार तळे परिसरातील अष्टविनायक रिक्षा स्थानकावरील रिक्षा चालकांना आणि त्यांच्या कुटुंबाला एक मदत या नात्याने माजी नगरसेवक वसंत लेवे यांनी हा उपक्रम राबवला. खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त रिक्षाचालकांना सातारा शहरातील काही जेष्ठ नागरिकांच्या हस्ते लेवे यांनी दहा रिक्षा चालकांना त्यांच्या मुलींच्या नावे दहा हजार रुपयांच्या ठेव पावत्या प्रदान केल्या.
या उपक्रमाविषयी बोलताना वसंत लेवे म्हणाले, रिक्षाचालकांना सातत्याने इंधनवाढ तसेच वाढती महागाई या कारणांमुळे उदरनिर्वाह करणे अवघड होत चालले आहे. रिक्षा चालकांना एक मदत व्हावी या कारणाने हा मुलींच्या नावे ठेव पावतीचा कार्यक्रम राबवण्यात आला आहे. या योजनेसाठी नगरसेवक वसंत लेवे यांनी स्वतः एक लाखाची पदरमोड केली आहे. मात्र याचा कोणताही गवगवा न करता सढळ हाताने मदत देऊन रिक्षाचालकांच्या अडीअडचणीत आणि त्यांच्या वेळेला धावून जाणे हे महत्त्वाचे आहे, असे लेवे यांनी बोलताना सांगितले.
रिक्षा चालकांनी सुद्धा या उपक्रमाचे कौतुक करत गदगदल्या स्वरात लेवे यांना धन्यवाद दिले. नगरसेवक कसा संवेदनशील असावा याचे वसंत लेवे हे उत्तम उदाहरण आहे. या मदतीमध्ये कोणतीही प्रसिद्धी बाळगण्याचा सोस नाही तर अडीअडचणीला धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव आहे, अशा प्रतिक्रिया रिक्षा चालकांनी या निमित्ताने दिल्या आहेत. या ठेव पावत्या गुरुवार पेठेतील शकुनी गणेश पतसंस्थेमध्ये सुरक्षित करण्यात आल्या आहेत.


