maharashtra

तापोळा येथील धर्तीवर ठोसेघर येथे उभारणार टेन्ट

पर्यटनाला मिळणार चालना ; सुरक्षा रक्षकाची तरतुद, सातारा वन विभागाचा पुढाकार

Tent to be erected at Thoseghar on the lines of Tapola
तापोळा, ता. महाबळेश्वर येथील धर्तीवर ठोसेघर, ता. सातारा येथे वन विभागाच्या माध्यमातून धबधबा परिसरात पर्यटकांसाठी निवासी टेन्ट (तंबु) उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यावर युद्धपातळीवर अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे येत्या १५ ते २०  दिवसात पर्यटकांना टेन्टमध्ये राहण्यासह वन विभागाच्या वाहनातून जंगल सफारीचा आनंद लुटता येणार आहे.

सातारा : तापोळा, ता. महाबळेश्वर येथील धर्तीवर ठोसेघर, ता. सातारा येथे वन विभागाच्या माध्यमातून धबधबा परिसरात पर्यटकांसाठी निवासी टेन्ट (तंबु) उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यावर युद्धपातळीवर अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे येत्या १५ ते २०  दिवसात पर्यटकांना टेन्टमध्ये राहण्यासह वन विभागाच्या वाहनातून जंगल सफारीचा आनंद लुटता येणार आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी वन विभागाने हा उपक्रम हाती घेतला असून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकाचीही तरतूद करण्यात आली असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, गेल्या काही वर्षात ठोसेघर येथील धबधबा जगाच्या नकाशावर पोहचला आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये देश-विदेशातुन अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देऊन पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटत असतात. मुसळधार पाऊस, जोराचा वारा, धुक्याची झालर, ठिकठिकाणी पडणारे छोटे- मोठे धबधबे या पर्वणीचा आनंद लुटण्यासाठी विशेषतः तरुणाई मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भेटी देतात.
ठोसेघर हे आता केवळ पावसाळी पर्यटनस्थळ न ठरता बारमाई पर्यटनस्थळ झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन सातारा तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी उप वनसंरक्षक अधिकारी महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली परळी वन विभाग मंडलाचे वनपाल सोळंकी यांच्या सहकार्याने वन विभागाच्या माध्यमातून ठोसेघर धबधबा परिसरात पर्यटकांसाठी  तापोळा येथील धर्तीवर  टेन्ट (तंबु) उभारण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयावर युद्ध पातळीवर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. येत्या १५ ते २० दिवसात टेन्टमध्ये राहण्याची सुविधा पर्यटकांना मिळणार असून त्यासाठी एक स्वतंत्र पॅकेज तयार केले जात आहे.  २४ तासांसाठी प्रति व्यक्ती १ हजार ५०० ते १ हजार ८०० रुपये असे शुल्क आकारण्याचा मानस असून यामध्ये सकाळचा चहा, नाश्ता आणि दोन वेळचे शाकाहारी जेवण याचा समावेश करण्याचा निर्णय होऊ शकतो. याबाबत अंतिम निर्णय झाला नसला तरी येत्या काही दिवसात त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. रात्रीच्या चांदण्यात प्राण्यांचे दर्शन, टिपूर चांदण्याची पर्वणी पर्यटकांना लुटता यावी यासाठी
टेन्टमध्ये राहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना सातारा वन विभागाच्या माध्यमातून रात्रीची जंगल सफर ही संकल्पना अमलात आणण्याचा प्रयत्न सुरू असून त्यासाठी सर्व सोयींयुक्त आणि संपूर्ण संरक्षण असणारे वाहनाची लवकरच खरेदी करण्यात येणार आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी हाती घेतलेल्या या उपक्रमाला पर्यटकांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा, असे आवाहन वनविभागाच्या विभागाच्या माध्यमातून केले जात आहे.टेन्टमध्ये राहण्यास येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारीही घेण्याचा विचार वन विभाग करीत असून त्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समितीमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याची सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्ती करण्याचा विचार सुरू आहे.

टेन्टमध्ये राहण्यासाठी ऑनलाइन होणार बुकिंग
जागतिक वारसा म्हणून ओळख असणाऱ्या कास येथील पठारावर फुले पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी वन विभागाने ऑनलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याच धर्तीवर ठोसेघर येथे टेन्टमध्ये राहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी ऑनलाइन बुकिंग करण्यासाठी एक संकेतस्थळ निर्माण करण्यात येत असून ऑनलाईन बुकिंगच्या माध्यमातूनच पर्यटकांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

वनपाल सोळंखी यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी
परळी मंडल वन विभागात काही दिवसांपूर्वीच वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोळंखी नावाच्या अधिकाऱ्यावर वनपालाची जबाबदारी दिली आहे. सोळंखी यांनी सूत्र स्वीकारल्यानंतर  काही दिवसातच ठोसेघर पठार विभागातील वणवा लावण्याचे प्रकार नियंत्रित करण्यावर भर देण्याचा  प्रयत्न केला. ज्याठिकाणी वणवा लागला आहे, त्या ठिकाणी आपल्या कर्मचाऱ्यांसह पोहोचून वणवा आटोक्यात आणण्याचे आव्हान पेलले. वन विभागाने राबवलेल्या रात्र गस्तीमध्ये सहभागी होऊन रात्रीच्या वेळी होणाऱ्या वन्यप्राण्यांच्या शिकारीला अटकाव करण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केलेले काम पाहता ठोसेघर धबधबा परिसरात टेन्ट उभारल्यानंतर त्यांच्या माध्यमातून या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास वन विभागाला वाटत आहे.

न्याहरी निवास केंद्रातून स्थानिक युवकांना मिळणार रोजगार
ठोसेघर धबधबा परिसरात पर्यटकांसाठी न्याहरी निवास केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र निधीच्या तरतुदीचा अभावी अद्याप ते सुरू करण्यात आले नाही. टेन्टमध्ये राहण्यास येणाऱ्या पर्यटकांसाठी न्याहरी निवास केंद्रातून चहा नाश्ता आणि जेवण उपलब्ध करून देण्याचा वन विभागाचा मानस आहे. निधी उपलब्ध झाला नाही तर त्यावर पर्याय म्हणून ही जबाबदारी स्थानिक युवकांवर सोपवुन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा वन विभागाचा विचार असल्याचे समजते.