जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे तीन रुग्ण आढळले
नागरिकांनी वेळेवर तपासणी करावी : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण
कोरोनाच्या धक्क्यातून सातारा जिल्हा अद्याप सावरलेला नसताना जिल्ह्यामध्ये स्वाइन फ्लूचे तीन रुग्ण आढळून आल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आरफळ, ता. सातारा, महाबळेश्वर, ता. महाबळेश्वर आणि मुंबई येथील एका रुग्णाचा त्यामध्ये समावेश आहे. दरम्यान नागरिकांनी काळजी घेऊन वेळेवर तपासणी करावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी केले आहे.
सातारा : कोरोनाच्या धक्क्यातून सातारा जिल्हा अद्याप सावरलेला नसताना जिल्ह्यामध्ये स्वाइन फ्लूचे तीन रुग्ण आढळून आल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आरफळ, ता. सातारा, महाबळेश्वर, ता. महाबळेश्वर आणि मुंबई येथील एका रुग्णाचा त्यामध्ये समावेश आहे. दरम्यान नागरिकांनी काळजी घेऊन वेळेवर तपासणी करावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी केले आहे.
गेल्या तीन वर्षांमध्ये सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या तीन लाटा येऊन गेल्या. जिल्ह्याची परिस्थिती कुठेतरी पूर्वपदावर येत असताना पुन्हा चौथी लाट आल्यामुळे जिल्ह्यातील नागरिक हडबडून गेले होते. चौथ्या लाटेचा प्रभाव अद्याप कमी झालेला नसताना जिल्ह्यामध्ये स्वाइन फ्लूने शिरगाव केल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्य यंत्रणेने चार दिवसांमध्ये सात जणांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले असता त्यापैकी आरफळ, ता. सातारा, महाबळेश्वर, ता. महाबळेश्वर आणि मुंबई येथील एका अशा तीन जणांना स्वाइन फ्लू झाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून जिल्ह्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, स्वाइन फ्लूच्या विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालय यामध्ये औषधांसह यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी शिकताना अथवा खोकताना रुमालाचा वापर करावा, आपले हात स्वच्छ धुवावेत. ताप, खोकला अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ आपली तपासणी करून घ्यावी.


