maharashtra

काही लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत; आलेच तर तेव्हा पाहू : आ. जयकुमार गोरे


Some people cannot live without power
रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने सातारा जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली. या पार्श्‍वभूमीवर भाजप जिल्हाध्यक्ष व आ. जयकुमार गोरे यांना माध्यम प्रतिनिधींनी छेडले असता सत्ता नसली काही लोकांची अवस्था पाण्याविना मासा जसा तडफडतो तशी होते. त्यांच्या प्रवेशाबाबत मला काही कल्पना नाही. मात्र जर आलेच तर तेव्हा पाहू, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

सातारा : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे माजी सभापती मिस्टर रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने सातारा जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली. या पार्श्‍वभूमीवर भाजप जिल्हाध्यक्ष व आ. जयकुमार गोरे यांना माध्यम प्रतिनिधींनी छेडले असता सत्ता नसली काही लोकांची अवस्था पाण्याविना मासा जसा तडफडतो तशी होते. त्यांच्या प्रवेशाबाबत मला काही कल्पना नाही. मात्र जर आलेच तर तेव्हा पाहू, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
रामराजे नाईक निंबाळकर हे अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत. सातारा जिल्ह्यातील राजकारण ते शरद पवार यांच्या पंखाखाली राहून करत आहेत. या कालावधीत त्यांनी आमदारकीसह विधान परिषदेचे अध्यक्ष अशी पदेही भूषवली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात शिवसेना बंडखोर व भाजप युतीचे सरकार आले आहे. त्यातच रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई राहूल नार्वेकर वे भाजपमध्ये असून ते विधान परिषदेचे अध्यक्षही झाले आहेत.
या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यात कालपासून रामराजे नाईक निंबाळकर देखील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष व आ. जयकुमार गोरे आज साताऱ्यात आले असताना पत्रकारांनी त्यांना त्यांचे कट्टर राजकीय विरोधक रामराजे नाईक निंबाळकर हे भाजपच्या वाटेवर असल्याबाबत छेडले. त्यावेळी आ. गोरे प्रथम याबाबत मला काही माहिती नाही, अशी प्रतिक्रिया नोंदवली.
त्यानंतर देखील माध्यम प्रतिनिधींनी त्यांचा पिच्छा सोडला नाही. तेव्हा आ. गोरे म्हणाले, जिल्ह्यातील काही लोकांची अवस्था अशी आहे,  जर सत्ता नसेल तर त्यांची अवस्था पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर जशी होते तशी झालेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सातारा जिल्ह्यातील राजकारण, सहकारात सत्ता भोगून देखील त्यांच्या इच्छा अपूर्णच आहेत. कदाचित त्यामुळे ते भाजपमध्ये येत असतील पण मला याबाबत काही माहिती नाही. तसे काही असेल तर भाजपमधील वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतली मी एक छोटा माणूस आहे.
रामराजे आणि आपला राजकीय संघर्ष उभ्या राज्याला माहिती आहे. जर रामराजे भाजपमध्ये आले तर आपली भूमिका काय असेल असे विचारले असता, आ. जयकुमार गोरे म्हणाले, त्यांनी जरा सत्ता नसताना कार्य करुन दाखवण्याची गरज आहे. सत्ता नसते तेव्हा काय होते याचा अनुभव त्यांना आला पाहिजे. त्यांच्याकडेच जिल्ह्यातील सत्ता होती. सत्ता नसताना राजकारणात कसे जिंकायचे, सत्ता नसताना समाजकारण कसे करायचे हे करुन दाखवले तर तर त्यांना मानू. भाजपमध्ये आले तर तेव्हाचे तेव्हा बघूया. आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. जेव्हा येतील तेव्हा माझी भूमिका मी स्पष्ट करेन, असे आमदार गोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.