maharashtra

जबरदस्तीने सोन्याची चैन चोरणार्‍या दोन युवकांना अटक

पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई

मारहाण करुन जबरदस्तीने सोन्याची चैन चोरणार्‍या दोन युवकांना जेरबंद करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले आहे. या चोरट्यांकडून सहा तोळे वजनाची चैन व दोन दुचाकी असा 5 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सातारा : मारहाण करुन जबरदस्तीने सोन्याची चैन चोरणार्‍या दोन युवकांना जेरबंद करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले आहे. या चोरट्यांकडून सहा तोळे वजनाची चैन व दोन दुचाकी असा 5 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आशुतोष सयाजीराव भोसले (वय 23, रा. कृष्णविहार सोसायटी, शाहूनगर, गोडोली, सातारा) आणि संजय सायबु पवार (वय 22, रा. नामदेववाडी, प्रतापगंज पेठ, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या युवकांची नावे आहेत.
सातारा शहर परिसरामध्ये जबरी चोरी करून चैन चोरीचे प्रकार घडत असताना सदर चोरी करणारे इसमास पकडणे बाबत पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक अजित बोर्‍हाडे, पोलीस उपअधिक्षक मोहन शिंदे यांच्या मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सातारा गुन्हे प्रकटीकरण पथकास मार्गदर्शन करून हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या. त्या अनुषंघाने सातारा डी.बी. पथकातील पोलीस स्टाफ रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेवून त्यांचे हालचालीवर लक्ष ठेवून होता.
दि. 17 सप्टेंबर रोजी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास निशीगंधा कॉलनी, संभाजीनगर सातारा येथे विना नंबरप्लेटच्या मोटारसायकवरून दोन जणांनी येवून या कॉलनीमधील एक रहिवासी गाडीवरून जात असताना त्यांना रोडवर अडवून लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सहा तोळे वजनाची चैन जबरदस्तीने ओढून घेवून तेथून ते पळून गेले होते. घटनेचे गांभिर्य ओळखून तात्काळ सातारा शहर डी.बी. पथकाने या परिसरात चोरटयांची कौशल्यपूर्वक माहिती प्राप्त करून दोन चोरट्यांना अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. त्यांचेकडे गुन्ह्याबाबत विचारपूस करीत असताना ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यापैकी एक युवक हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी देखील सातारा शहर, सातारा तालुका, शाहुपूरी पोलीस ठाण्यात मारहाणीचे, चोरीचे, लुटमारीचे एकूण 5 गुन्हे दाखल आहेत. या चोरटयांची पोलीस कस्टडी रिमांड घेवून अधिक कसोशिने चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यांचेकडील या गुन्ह्यातील सहा तोळे वजनाची सोन्याची चैन, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व मोपेड जप्त केली आहे.
या तपासा दरम्यान या चोरट्यांची तांत्रिक माहिती घेतली असता हे चोरटे लुटमार करण्याच्या अगोदर रेकी करून लुटमार करीत असल्याचे दिसून आले. त्यामध्ये अनेक धक्कादायक गुन्हे करण्याच्या तयारीत हे चोरटे असल्याचे दिसून आले. चौकशी दरम्यान या चोरट्यांनी यापूर्वी देखील एका सोनारास लुटले असल्याचा गुन्हा केल्याची कबूली त्यांनी दिलेली असून त्याबाबत अधिक तपास सुरू आहे. या चोरटयांकडून एकूण 5 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक अजित बोर्‍हाडे, पोलीस उपअधिक्षक मोहन शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, महिला पोलीस निरीक्षक श्रीमती वंदना श्रीसुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो.ना. सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, विक्रम माने, गणेश भोंग, सागर गायकवाड, गणेश घाडगे, संतोष कचरे, विशाल धुमाळ, गणेश घाडगे यांनी केलेली आहे.