तोतया नेव्ही अधिकारी आकाश डांगेकडून सांगली जिल्ह्यातील सहा युवकांना 30 लाखांचा गंडा
आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : भरतीचे अमिष दाखवून केली फसवणूक
पोलिसांचा तडाखा खाल्यानंतर खरं तर मोक्का लावण्याची गरज असताना देखील पोलिसांच्या मेहरबानीने मोकाट फिरून आणखी कांड करत असलेल्या आकाश डांगे सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर विविध ठिकाणी आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी दाखल होत आहेत.
सातारा : फलटण तालुक्यातील भाडळी बुद्रूक गावातील तोतया नेव्ही अधिकारी आकाश डांगेवर यापूर्वी देखील आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांचा पाहुणचार घेत असलेल्या आकाश डांगेवर तक्रारींचा ओघ सुरु झाला असून सांगली जिल्ह्यातील सहा युवकांना सैन्य भरतीचे अमिष दाखवून 30 रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी डांगेवर आता आष्टा, जि. सांगली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याची वरात आता सांगली जिल्ह्यातही निघणार आहे.
भारतीय सैन्य दल, नेव्हीत भरती करतो असे सांगून सातारा जिल्ह्यासह राज्यभरातील युवकांची फसवणूक कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आणि या प्रकरणात पोलिसी हिसका बसल्यावर वाळू तस्करीत घुसलेल्या आणि त्यातही पोलिसांचा तडाखा खाल्यानंतर खरं तर मोक्का लावण्याची गरज असताना देखील पोलिसांच्या मेहरबानीने मोकाट फिरून आणखी कांड करत असलेल्या आकाश डांगे सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर विविध ठिकाणी आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी दाखल होत आहेत.
सांगली जिल्ह्यातील आष्टा पोलीस ठाण्यात सहा युवकांनी त्यांची 30 लाख रुपयांची फसवणूक आकाश डांगेने केली असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर आता डांगेवर गुन्हा दाखल झाला असून याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार युवक नितीन मानसिंग दळवी (वय 27, रा. बहाद्दूरवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) याने तक्रारीत म्हटले आहे की, 2019 सालात नितीन हा भरतीसाठी प्रयत्न करत होता. मात्र, भरती होत नव्हता. त्यावेळी त्याच्याच निवृत्त जवान अजित संदे यांच्या माध्यमातून नितीनची आकाश डांगेशी ओळख झाली. डांगे भरतीची कामे खात्रीपूर्वक करतो असे त्याला सांगण्यात आले होते. डांगेशी फोनवर संपर्क झाल्यानंतर डांगे बहाद्दूरवाडीत गेला होता. त्यावेळी नितीनसोबत भरतीची तयारी करत असलेले त्याचे मित्र संकेत हिंदूराव माने व दीपक अनिल पाटील (दोघे रा. भडकंबे), रोहित मानसिंग दळवी रा. बहाद्दूरवाडी, राजकुमार नागाप्पा कोळी रा. आष्टा व राहूल जयवंत गायकवाड (रा. काकाचीवाडी, ता. आष्टा) हे सहाजण आकाश डांगेला भेटले.
यावेळी आकाश डांगे हा नेव्हीच्या युनिफॉमध्ये होता. त्याने या सहा युवकांना तुमचे काम होईल तुम्ही प्रत्येकाचे पाच पाच लाख रुपये जमा करा. मी आठवड्यानंतर येतो, असे सांगितले व निघून गेला. त्यानंतर ऑक्टोबर 2019 मध्ये एके दिवशी रात्री 7 वाजता आकाश डांगे बहाद्दूरवाडीत आला होता. त्यावेळी त्याने या युवकांना माझे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून तुमचे काम नक्की होईल असा विश्वास दिला. तुम्हाला लवकरच जॉईनिंग लेटरही देतो, असे सांगून या युवकांची सर्व माहिती लिहून घेतली होती.
21 जानेवारी 2019 मध्ये आकाश डांगे बहाद्दूरवाडीत गेला व त्याने तक्रारदार सहा युवकांना जॉयनिंग लेटर देवून 25 मार्च 2019 रोजी ओरिसा राज्यातील आय. एन. एस. चिल्का येथे मेडिकलसाठी हजर राहण्यास सांगितले. यावेळी डांगेला या युवकांनी प्रत्येकी पाच पाच लाख रुपये 30 लाख रुपये रोख स्वरुपात दिले होते. डांगेने या युवकांना समवेत घेवून रेल्वेने त्यांना भुवनेश्वरला जाण्यासाठी मुंबईला नेले. भुवनेश्वरमध्ये पोहोचल्यावर डांगे युवकांना चिल्का येथे वादळ झाल्याने ट्रेनिंग सेंटर विस्कळीत झाल्याचे कारण देत तेथून युवकांना पुन्हा घरी पाठवले व नंतर लवकरच सांगतो अशी ग्वाही दिली होती. मात्र, त्यानंतर या युवकांनी फोनवरुन डांगेशी संपर्क साधला असता डांगेने लॉकडाऊनमुळे भरती बंद असल्याचे सांगितले. त्यानंतर तो सातत्याने उडवाउडवीची उत्तरे देवून लागल्यावर युवकांनी पैसे परत मागितले.
मात्र, त्यावेळी डांगेने या युवकांना 30 लाख रुपयांचा एक चेक दिला तो वटवू नका. दोन महिन्यात तुमचे पैसे परत करतो असे सांगितले. पैसे मिळाले नाहीतर चेक वटवा असे सांगितले. जून 2020मध्ये डांगेवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती युवकांना कळाल्यावर हे युवक भाडळी बुद्रूक, ता. फलटण येथेही गेले होते. तो घरी नव्हता. चेक बँकेत टाकला असता तो वटला नाही. डांगे फोनही उचलत नव्हता. आता तर तो पुन्हा पोलिसांच्या ताब्यात असल्याचे युवकांना कळाल्यानंतर शेवटी नितीन दळवी व त्याच्या मित्रांनी आष्टा पोलीस ठाण्यात या सर्वांची आकाश डांगे याने 30 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार दिली असून पोलिसांनी डांगेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आता या तक्रारीनंतर डांगेचा मुक्काम सांगली जिल्ह्यात हलणार असून अद्याप त्याला अटक झालेली नाही. अधिक तपास पोलीस निरीक्षक आण्णासाहेब बाबर करत आहेत.


