maharashtra

जिल्ह्याच्या राजकारणामध्ये भाजप-राष्ट्रवादीमध्ये टोकाचा संघर्ष

राजकारणाच्या साठमारीत कॉरिडॉर सारखे विकास प्रकल्प पडतात मागे

कॉरिडोरच्या कार्यक्षेत्रावरून माण तालुक्यामध्ये आणि उत्तर कोरेगाव तालुक्यामध्ये गटा-तटाचा राजकीय वादंग सुरू आहे. याचे साद-पडसाद आगामी सातारा जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये दिसून येणार आहेत.

सातारा : सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये म्हसवड कॉरिडोर ने जिल्ह्याच्या राजकारणाला चांगलीच उकळी आणली आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांच्यातील राजकीय कलगीतुऱ्याने राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा टोकाचा संघर्ष दिसून येत आहे. कॉरिडोरच्या कार्यक्षेत्रावरून माण तालुक्यामध्ये आणि उत्तर कोरेगाव तालुक्यामध्ये गटा-तटाचा राजकीय वादंग सुरू आहे. याचे साद-पडसाद आगामी सातारा जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये दिसून येणार आहेत.
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पुन्हा रिचार्ज होण्याच्या तयारीत आहे. गेल्या एक महिन्यामध्ये दादांनी सातारा जिल्ह्यामध्ये माण तालुक्याचा दोन वेळा दौरा केला. या दौऱ्यामध्ये अजितदादांनी गट-तट विसरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एकत्रितपणे पुढे येऊन काम करा, असा संदेश तर दिलाच पण सत्तेचा फार माज करू नका, अश्या खणखणीत शब्दात विरोधकांनाही ठणकावले. माण तालुक्यामध्ये राष्ट्रवादीला अजूनही आमदार जयकुमार गोरे यांना पर्याय शोधता आलेला नाही. आमचं ठरलंय असा वेगळा सावता सुभा मांडणाऱ्या स्थानिक नेत्यांचा आमदार जयकुमार गोरे यांनी नेहमीच करेक्ट कार्यक्रम केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची फौज माण तालुक्यात कशी थंडावते आणि त्या मागची कारणे याचे उत्तर अजूनही राष्ट्रवादीला सापडलेले नाही. सातारा जिल्ह्यात कराड उत्तर, वाई आणि फलटण या तीन विधानसभा मतदारसंघातच राष्ट्रवादीची ताकद आहे. सध्या सातारा जिल्ह्यामध्ये शिंदे गटाचे दोन आमदार, भाजपचे दोन आमदार असे संख्याबळ शिंदे गट आणि भाजप युतीचे दिसून येत आहे. भाजपने सध्या राज्यात झालेल्या 194 ग्रामपंचायतीवर आपल्या विजयाची पताका फडकवली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा सातारा तालुका वगळता इतरत्र ठिकाणी भाजपला पंचायत राज मधील राष्ट्रवादीचा चिरेबंदी गड भेदण्यामध्ये यश मिळायला सुरुवात झाली आहे. सातारा तालुक्यात उदयनराजे भोसले व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आघाड्यांचे राजकारण सध्या भाजपला जरी अडचणीचे असले तरी दोन्ही नेते भाजपचेच, असे सांगायला भाजप कमी करत नाही. राजघराण्याचा प्रभाव पाहता सध्या तरी जयकुमार गोरे यांनी सातारा तालुक्याच्या राजकारणात अद्याप हस्तक्षेप केलेला नाही. कोरेगाव तालुक्यात आमदार शशिकांत शिंदे यांचा हरवलेला राजकीय फॉर्म परत येण्याची चिंता राष्ट्रवादीला सतावत आहे. खंडाळा तालुक्यामध्ये पुरुषोत्तम जाधव यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात उभे रान पेटवण्याची रणनीती आखली आहे, तर पाटण तालुक्यामध्ये उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे यांच्या विरोधात सत्यजित पाटणकरांनी राजकीय मोर्चे बांधणी सुरू केल्याने एकूण जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा टोकदार संघर्ष सुरू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या आगामी राजकारणात नक्की काय चित्र निर्माण होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

म्हसवड कॉरिडॉरच्या निमित्ताने किमान शंभर कोटीचे स्टार्टअप सुरू होऊन जिल्ह्याच्या दुष्काळी पट्टयात रोजगार उपलब्ध होईल. मात्र या प्रकल्पाची सखोलता लक्षात घेऊन त्या प्रकल्पांचे राजकारण न करण्याची राजकीय उंची जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी दाखवत नाहीत. म्हसवड कॉरिडॉरच्या निमित्ताने एक हजार कोटीची गुंतवणूक होईल, असा अंदाज आहे. भाजप व राष्ट्रवादी यांच्यातील राजकीय साठमारीचा फटका या प्रकल्पांना बसू नये, ही जिल्हावासियांची अपेक्षा आहे.